कोरोनामुळे डबघाईला आलेल्या पथविक्रेत्यांच्या मदतीला सरसावली सांगोला नगरपालिका

सांगोला दि.२७(क.वृ.): सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व फेरीवाले, फळविक्रेते,पथविक्रेते यांना लॉक डाऊन काळात मोडकळीस आलेल्या व्यवसायांना पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र पुरस्कृत *"पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी(पीएम स्वनिधी)*"या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शहरातील पथ विक्रेत्यानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन काळात डबघाईस आलेल्या पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता (आत्मनिर्भर निधी) या योजनेची शहरात सांगोला नगरपरिषदेच्या वतीने प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत पथ विक्रेत्यांना विशेष सूक्ष्म पतपुरवठा केला जात असून बँकेच्या सहाय्याने अशा पथ विक्रेत्यांना विनातारण दहा हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे. यामध्ये भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी वडापाव, अंडी, कापड वस्तू, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी इत्यादी विक्रेत्यांचा समावेश आहे. तसेच केशकर्तनालय, चर्मकार, पान दुकान, लॉंड्री दुकान त्यांचाही समावेश असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा ई सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ही योजना 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी विक्रीकरिता असलेल्या सर्व पथ विक्रेत्यांना लागू आहे. दि. 27 सप्टेंबर 2020 अखेर सांगोला शहरातील *सुमारे 180 शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केले होते त्यापैकी 78 व्यक्तींचे अर्ज प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ़ इंडिया, स्टेट बँक ऑफ़ इंडिया, युनियन बँक ऑफ़ इंडिया शाखा सांगोला यांनी मंजूर करून त्या व्यक्तींना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे सात लाख ऐंशी हजार रुपये एवढी कर्ज रक्कम बॅंकांनी मंजूर केलेलीा असुन 12 लाभार्थीच्या खात्यात दहा हजार रुपये प्रमाणे एक लाख विस हजार रुपये एवढी कर्ज रक्कम जमा करण्यात आलेली आहे . कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट व पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक ऑफर देखील दिली जाणार आहे.
सांगोला नगरपरिषदेच्या वतीने "पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी" (पी.एम स्वनिधी योजना) या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. लॉकडाउन काळामध्ये व्यवसाय विस्कळीत झालेल्या पथ विक्रेत्यांना या योजनेमुळे नवीन उभारी मिळणार असून जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरात या योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शनाचे कार्य योगेश गंगाधरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (मोबाईल क्र: 9970613961) हे करीत आहेत.
0 Comments