महूद व भाळवणी परिसरातील कासाळगंगा ओढ्यालगतच्या नुकसानग्रस्त भागाची दिपक आबांकडून पाहणी


सांगोला दि.२०(क.वृ.): सलग काही दिवसांपासून आटपाडी, म्हसवड सह सांगोला तालुक्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कासाळ ओढा व महूद भाळवणी परिसरातील नद्या-नाले व ओढ्यांना प्रचंड पाणी आले आहे यामध्ये अशा ओढ्यावर असलेले बंधारे फुटून हे पाणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीत आणि आणि घरात-दारात घुसले.अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे भाळवणी व महूद परिसरातील शेतकर्यांच्या डाळींब बागा, ऊस, शेतातील उभी पिके, दारातील जनावरे, शेळ्यामेंढ्या, पशु पक्षी, यांसह राहत्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अशा नुकसानग्रस्त कुटुंबांना शनि 19 रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळावरून दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सदर परिस्थितीचे गांभीर्य सांगितले आणि दूरध्वनीवरून उपविभागीय अधिकारी सचिन ढोले,उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उदयसिंह भोसले यांच्याशी संपर्क साधून उध्वस्त झालेल्या शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत करण्याबाबत सूचना केल्या.महूद पळशी, सुपली,उपरी आणि भंडीशेगाव या गावातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांची परिस्थिती दिपकआबांनी जाणून घेतली.
कासाळ ओढ्याचे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या आटपाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने अचानक या ओढ्याला प्रचंड पाणी आले होते या ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यात हे पाणी न सामावल्याने बंधारे फोडून हे पाणी चिक-महूद, महूद, गार्डी,पळशी, सुपली उपरी, भंडीशेगाव, वाडीकुरोली आणि शेळवे या ओढ्यालगत असणाऱ्या गावातील शेतात घुसले यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये डाळिंबाच्या बागा,ऊस,शेतातील उभी पिके, कोंबड्या, शेळ्या मेंढ्या, अक्षरशः वाहून गेली तर राहती घरेही जमीनदोस्त झाली निसर्गाच्या अवकृपेमुळे येथील शेतकऱ्यांवर फार मोठे संकट ओढवले आहे अशा संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील पुढे सरसावले आणि त्यांनी प्रत्यक्ष थेट घटनास्थळी जाऊन झालेल्या या नुकसानाची पाहणी केली. अचानक आलेल्या या संकटातून सावरण्यासाठी प्रशासनाने अजिबात दिरंगाई न करता आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील शेतकऱ्यांचे व सामान्य नागरिकांचे झालेले नुकसान पाहता, अशा नुकसानग्रस्त नागरिकांचे तात्काळ पंचनामे करावे व त्यांना तातडीची मदत मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी दिपकआबांनी यावेळी केली यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक ती सर्व मदत प्रशासनाला करण्याची तयारी आबांनी दर्शविली.
0 Comments