माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, दि.१९(क.वृ.): कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांनी, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरुन जिल्हाधिकारी शंभरकर यांची मुलाखत आज प्रसारीत झाली. त्या मुलाखतीत श्री.शंभरकर यांनी हे आवाहन केले. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे यांनी ही मुलाखत घेतली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील गृहभेटीद्वारे संशयित रुग्णांची तपासणी, जोखमीचे रुग्ण ओळखुन उपचार, आरोग्य शिक्षण हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे सांगून श्री. शंभरकर म्हणाले, “ही मोहीम 15 सप्टेंबर पासून 24 ऑक्टोबर 2020 पर्यंत दोन टप्प्यात होईल. ही मोहिम सोलापूर महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रात राबविली जाईल. मोहिमेत आरोग्य पथकाद्वारे घरोघरी जावून तपासणी केली जाईल. एका आरोग्य पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील, हे पथक घरातील सर्व सदस्यांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासेल संबंधित माहिती लगेचच राज्य शासनाने विकसित केलेल्या मोबाईल ॲपमध्ये भरली जाईल.”
मोहिमेत सहभागी आरोग्य पथकांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नोंदी कश्या घ्याव्या, त्याची मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये माहिती कशी भरावी, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
या मोहिमेच्याद्वारे सतत मास्क घालावा, साबणाने हात स्वच्छ धुवावे, नाक,तोंड,डोळे यांना हात लावू नये, ताप,सर्दी,खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, अशी लक्षणे दिसल्यास तपासणी करुन घ्यावी. तसेच लगेच उपचार करुन घ्यावेत हे संदेश प्रभावीरित्या जनतेपर्यंत पोहचविले जाणार आहेत. बरे झालेल्या कोरोनाबाधितांनी काय काळजी घ्यावी, याबाबतही या मोहिमेतून संदेश दिला जाणार आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
0 Comments