Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिका हद्दीत सुट्ट्या सिगारेट, बिडी विक्रीवर आता कडक बंदी लागू होणार - आयुक्त पी.शिवशंकर

सोलापूर महानगरपालिका हद्दीत सुट्ट्या सिगारेट, बिडी विक्रीवर आता कडक बंदी लागू होणार - आयुक्त पी.शिवशंकर

सोलापूर दि.२६(क.वृ.): राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर राज्य सरकारने दि.24 सप्टेंबरच्या अधिसूचनेने बंदी घातली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता टपरी किंवा अन्य कोणत्याही दुकानात विडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही. विडी आणि सिगारेटचे संपूर्ण पाकिट विकणे बंधनकारक राहणार आहे.

राज्यात लोक मोठ्या संख्येने या व्यसनाकडे वळत आहेत व विशेषतः तरुण वर्ग व्यसनाधिन होत आहे. यामुळे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, शाळेतील मुले मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, एक किंवा दोन अशा सुट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत तर ल़ोक तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन होणार नाहीत. यापूर्वीच राज्य शासनाकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

सुटय़ा सिगारेट-बिडी विकत घेणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे अशा प्रतिबंधामुळे नागरिकांना सुट्टी सिगारेट-बिडी मिळणार नाही. सिगारेट व बिडीचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नुकसान याची माहिती त्यांच्या पाकिटावर छापलेली असते. हा ‘वैधानिक’इशारा धूम्रपान करणारे मनावर घेत नाहीत. एक किंवा दोन अशा सुटय़ा स्वरूपात सिगारेटची जेव्हा विक्री केली जाते तेव्हा त्या विकत घेणाऱ्याला अशा प्रकारची कोणतीही सूचना किंवा ‘वैधानिक इशारा’ लेखी स्वरूपात त्यावर छापलेला नसतो त्यामुळे त्यांना त्याचे गांभीर्य समजत नाही. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयामुळे याला आळा बसणार आहे आहे.

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात सर्व विभागात विभागीय अधिकारी यांच्यामार्फत व स्वच्छता निरीक्षकांच्या मार्फत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या टपरी व दुकानदारांवर याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्यात येतील याबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 

Reactions

Post a Comment

0 Comments