‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेचा आज प्रारंभ जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

सोलापूर, दि.१४(क.वृ.): सोलापूर जिल्ह्यात उद्या दि.15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ होणार असून लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सर्व पथकांना साहित्याचे वाटप केल्याची माहितीही श्री.शंभरकर यांनी दिली.
मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. प्रत्येक गावात लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य पथकांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. आरोग्य पथकाला सर्व साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे एक पथक घरोघरी जाऊन आरोग्यविषयक चौकशी करणार आहे. या पथकाला माहिती देऊन सहकार्य करावे. हे पथक प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. मधुमेह, ह्रदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मोहिमेंतर्गत वैयक्तिक आणि संस्थांसाठी बक्षीस योजना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनो कोणताही आजार लपवू नका. वेळेत उपचार घेतले तर कोरोना बरा होतो, आरोग्य पथकाला संपूर्ण माहिती देण्याचे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले आहे.
0 Comments