पशुवैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षामुळे, अजनाळे येथील अनेक शेळ्या दगावल्या अकार्यक्षम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात

अजनाळे - (क.वृ.) : अजनाळे ता.सांगोला येथे गेल्या पंधरा दिवसापासून निमोनिका व इतर आजारामुळे गावातील ३० ते ४० शेळ्या दगावल्यामुळे पशु पालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन कोरोनाने सर्वच घटकांचे कंबरडे मोडले असताना सांगोला तालुक्याचे अकार्यक्षम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शेळ्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे, त्यामुळे पशु पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पालन केलेल्या आणि जीवापाड जपलेल्या शेळ्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत असून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सचिन धांडोरे यांनी केली आहे. अजनाळे येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या दोन महिन्यापासून बंद अवस्थेतआहे. येथे कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी सुट्टीवर असल्याने हा दवाखाना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशा दयनीय अवस्थेत आहे.
अजनाळे आणि परिसरातील शेळ्या दररोज वेगवेगळ्या आजाराने मृत्यूमुखी पडत असल्यामुळे जिवापाड जपलेल्या शेळ्या यापुढे तरी जगतील का? हा प्रश्न पशुपालकांपुढे आहे.तर झोपेचे सोंग घेतलेला आणि पशुपालकांच्या जीवावर उठलेला पशुवैद्यकीय विभाग आतातरी जागा होणार का ? असा ही प्रश्न पशुपालकांना पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी उंटावरून शेळ्या राखण्याचे काम करत आहेत,त्यामुळे याचा जाब कोणाला विचारायचा? याला जबाबदार कोण? अजून किती शेळ्या मृत्युमुखी पाडायच्या आहेत याची पशुवैद्यकीय अधिकारी वाट बघत नाहीत ना? अशी चर्चा आजनाळे परिसरातून व्यक्त केली जात आहे. तरी वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष घालून मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पशुपालकांमधून मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
0 Comments