Hot Posts

6/recent/ticker-posts

'उजनी'तून भीमा नदीत 15 हजार क्‍युसेक विसर्ग; धरण परिसरात एकाच रात्रीत 100 मिलिमीटर पाऊस

'उजनी'तून भीमा नदीत 15 हजार क्‍युसेक विसर्ग; धरण परिसरात एकाच रात्रीत 100 मिलिमीटर पाऊस


सोलापूर दि.७(क.वृ.): उजनी धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. धरण परिसरात रविवारी (ता. 6) एकाच रात्रीत तब्बल 100 मिलिमीटर इतका पाऊस झाला. आज (सोमवारी) सकाळी उजनी धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून, त्याद्वारे 15 हजार क्‍युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. सध्या भीमा नदीत एकूण 16 हजार 600 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, वीर धरणातूनही नीरा नदीत 13 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भीमा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. रविवारी रात्री मेघगर्जनेसह सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे उजनीत येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 6 हजार तर बंडगार्ड येथून 7 हजार विसर्ग येत आहे. आज सकाळी धरण 111 टक्के भरले आहे. तर धरणात 223 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 
पंढरपूर तालुक्‍यालाही रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. पंढरपूर शहरातही मुसळधार पाऊस झाला. शहरात तब्बल 70 मिलिमीटर इतका पाऊस झाला. तर भंडीशेगाव मंडलात 65 मिलिमीटर पाऊस झाला. पटवर्धन कुरोली, कासेगाव, भाळवणी, तुंगत, चळे या भागातही जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना फायदा झाला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments