सांगोल्यासाठी किसान रेल्वे सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी - खा.रणजितसिंह निंबाळकर

चेतनसिंह केदार-सावंत यांच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त
सांगोला दि.२१(क.वृ.): माढा मतदारसंघातील सर्वात जास्त कृषी उत्पादन निर्यात करणारा सांगोला तालुका आहे. किसान रेल्वे सुरू झाल्याने आजचा दिवस सांगोल्यासाठी सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा सुरू आहे. नाशवंत शेती मालवाहतुकीसाठी एअर कंडिशन बोगी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दोन दिवसात आंतरराज्य बाजारपेठेत फळे व भाजीपाला पाठवणे शक्य होणार असून यात शेतकऱ्यांची प्रति पेटी 15 ते 20 रुपयांची बचत होणार असल्याचे सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
कोल्हापूर-मनमाड या किसान रेल्वे गाडी क्रमांक 00109 या ट्रेनला सांगोला रेल्वे स्थानकावर सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सांगोला रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, नगराध्यक्षा राणी ताई माने, जि.प.सदस्य अतुल पवार, नगरसेवक आनंद माने, माजी सभापती संभाजीतात्या आलदर, जेष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, सातारा जिल्हा भाजप उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अभिराज निंबाळकर, नितीन कर्णे, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, आरपीआय युवक आघाडी जिल्हाध्यक्ष रामस्वरूप बनसोडे, शेतकरी संघटनेचे भारत चव्हाण, भाजप शहरध्यक्षआनंद फाटे,अनिरुद्ध पुजारी, डॉ.जयंत केदार, शीतल लादे, वैजंती देशपांडे,अनिल विभूते, अनिल (बंडू) केदार, पुण्यवंत खटकाळे, विष्णुपंत केदार, संजय केदार, सूर्याजी खटकाळे, अभिजित नलवडे, मानस कमलापूरकर, अनिल कांबळे, बाळकृष्ण येलपले, विक्रम शेळके, दत्ता जाधव, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप हिरडे, भिसे, सांगोला स्टेशन मास्तर गंगाकुमार सिंह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष, खा.रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, किसान रेल्वे आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ट्रेनची संख्या वाढवली जाणार आहे. फळे व भाजीपालासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. ते स्वप्न आज पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्तविक करताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, राज्यात व परराज्यात माणदेशातील डाळिंबाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल, सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष, खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे सुरूवातीपासून पाठपुरावा केला होता. डाळिंब, सिमला मिरची, शेवगा, द्राक्ष, बोर यासह भाजीपाला व फळांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मालवाहतूक रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. आजचा दिवस सांगोल्याच्या दृष्टीने सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. आज किसान रेल्वेतून 50 टन डाळिंब व 25 टन सिमला मिरची पाठवण्यात आली. दररोज एक हजार टन डाळिंब निर्यात करणारा सांगोला तालुका आहे. यामुळे शेतकऱ्यांना एका बॉक्समागे 15 ते 20 रुपयांचा फायदा होणार आहे. सांगोल्याचं डाळिंब, बोर, द्राक्ष यासह फळे व भाजीपाला देशातील प्रत्येक बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासाठी किसान रेल्वेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान कोल्हापूर ते मनमाड या किसान रेल्वेला सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष, खा. निंबाळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या ट्रेनला पाच डबे असून आणखी डबे वाढविण्यात येणार असून आठवड्यातून एक दिवस गाडी धावणार आहे. पहिल्याच दिवशी ट्रेनमध्ये 75 टन शेतीमाल लोडिंग केल्यानंतर ट्रेन पुढे मार्गस्थ झाली.
0 Comments