लोकमंगल इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी आ. सुभाष देशमुख यांची घोषणा

सोलापूर दि.१६(क.वृ.): श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित, लोकमंगल इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आ. सुभाष देशमुख यांनी केली.
कोरोनामुळे मागील चार महिन्यांंपासून देशभरात टाळेबंदी असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, पालकांना शाळेचे शैक्षणिक शुल्क भरणे अडचणीचे ठरत आहे. याकरिता शाळेच्या वतीने संस्थेकडे मोफत शिक्षणाबाबतचा मानस व्यक्त करण्यात आला. या सर्व बाबी विचारार्थ घेत आणि वडाळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाव म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ. देशमुख यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रशालेत शिकणार्या विद्यार्थ्यांचे 2020-21 करिता शैक्षणिक शुल्क पूर्ण माफ केले. यावेळी उपाध्यक्ष संभाजीदादा पाटील यांनी चालू शैक्षणिक वर्षामध्ये नवीन प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता संस्था कटिबद्ध राहिल असे सांगितले. या योजनेचा लाभ वडाळा आणि परिसरातील, ग्रामीण भागातील गरीब सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांना होणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लोकमंगल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्याकरिता प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य श्रीकांत धारुरकर यांनी केले.
0 Comments