Hot Posts

6/recent/ticker-posts

काशी जगद्गुरुंचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान : मल्लिकार्जुन कावळे

 काशी जगद्गुरुंचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान : मल्लिकार्जुन कावळे


काशीपीठाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण
सोलापूर दि.१९(क.वृ.): समाजाला चांगला व योग्य मार्ग दाखवणे,समाजातील आबालवृद्धांचे वैचारिक प्रबोधन करणे यासाठी अध्यात्मिक ज्ञान देणे याबरोबरच गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देणे, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणे हे कार्य पाहता काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे असे प्रतिपादन श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मल्लीकार्जून कावळे यांनी केले.
श्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन,  काशीपीठ, जंगमवाडी मठ,  वाराणसीचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या श्री जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आर्किटेक्चर महाविद्यालयाचे संचालक यादगिरी कोंडा, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर, शिष्यवृत्ती विभाग सहाय्यक राजशेखर बुरकुले, बटरफ्लाय इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकाद्वय विजया बिराजदार व रश्मी पूर्वत उपस्थित होते. 
याप्रसंगी कावळे यांनी स्पर्धेच्या युगात शिक्षण खूप महत्वाचे असून जिद्द, चिकाटी व मेहनतीद्वारे आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. व्यसनांपासून दूर राहून आई-वडील व समाजाची मदत घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
काशीपीठातर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यापैकी उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या देशभरातून 300 विद्यार्थ्यांना प्रत्येकी प्रतिमहिना एक हजार रुपये शिक्षण सुरू झाल्यापासून शिक्षण संपेपर्यंत दिले जाते. त्याचे संपूर्ण कामकाज सोलापुरातून चालते. त्यापैकी सोलापूर शहरातील स्थानिक 12 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपयांचे धनादेश यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा केली जाते.
कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकातून विजया बिराजदार यांनी काशीपीठाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संबंधी माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत रश्मी पूर्वत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवणसिद्ध वाडकर यांनी तर आभारप्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केले. याप्रसंगी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांचे पालक आदी उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments