Hot Posts

6/recent/ticker-posts

मंगळवेढ्यात पानपट्टी बेकारीच्या आडून गुटखा विक्री; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

 मंगळवेढ्यात पानपट्टी बेकारीच्या आडून गुटखा विक्री; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

मंगळवेढा दि.७(क.वृ.): कोरोनाने सर्वच क्षेत्रावर परिणाम केला आहे. अगदी अवैध धंद्यावरही. मंगळवेढा शहरात  याच कोरोना काळात शंभरहून अधिक गुटखामाफिया उदयास आले असून, सध्या पानपट्टी बेकरीच्या नावाखाली गुटख्याचे मीटर सुरू असल्याचे चित्र आहे. असे जरी असले मंगळवेढा पोलिस याकडे डोळेझाक का करीत आहेत हा प्रश्न अनुत्तरीतच असून सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.

शहरात मुरलीधर चौक,दामाजी चौक,आण्णाभाऊ साठे चौक,बोराळे नाका आदी ठिकाणी पानपट्टीमध्ये बेकरीच्या आडून गुटका विक्री जोमात सुरू आहे. सध्या कर्नाटकातून होणारी गुटखा तस्करी चर्चेत आली आहे. यातून अनेकजण गब्बर होत असून, अवैध धंद्याने संतनगरीत जम बसविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोठी साखळी कार्यरत असल्याचे सांगण्यात येत असून, यातून होणारी उलाढाल डोळे दीपवणारी आहे. यातून शहरात नवीन गुन्हेगारी प्रवृती वाढीस लागत आहे.

लॉकडाउनमध्ये पानपट्टी व्यवसाय बंद ठेवला होता. त्यामुळे गुटखा मिळणे दुरापास्त झाले. त्यासाठी दुप्पट, तिप्पट रक्कम मोजण्यास सुरवात केली. यातून कर्नाटकातून गुटखा तस्करीला बळ मिळाले. तपासणी नाका सुरू झाल्यानंतर भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांतून गुटख्याची तस्करी केली. यातून अनेक वेळा कारवाई केली.

काही दिवसांपासून गुटखा तस्करी करणारी नव्या गुन्हेगारी प्रवृत्तीने शहरात जम बसवला आहे. यातून होणारी उलाढाल मोठी आहे. कर्नाटकातून आलेला गुटखा शहरातील विविध भागांत पोहोच करणारी छुपी यंत्रणा कार्यरत आहे. प्रत्येक दुकानात हा गुटखा पोहच केला जात होता. गिऱ्हाईकही ठरलेले आहे. त्यामुळे शहरात या गुटखा विक्रीला पक्का विळखा बसला आहे. पोलिसांनी अनेकवेळा कारवाई केली, पण गुटखा तस्करी राजरोस सुरूच आहे.

या गुटखा तस्करीतील पाळेमुळे शोधण्याची गरज आहे. मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याची आवश्‍यकता आहे. आता गुटखा तस्करीचाही गंभीर प्रकार पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघडकीस येत आहे. कर्नाटकातून दररोज लाखो रुपयांचा गुटखा शहरात येत असल्याची चर्चा आता होत आहे. त्याला पायबंद घालण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसह अन्न आणि औषध प्रशासनासमोर आहे.

मुख्य सूत्रधार गळाला लागेना

मंगळवेढा पोलिसांनी गुटखा पकडला नाही असे नाही. कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, या कारवायांमध्ये केवळ लहान-सहान व्यक्तींवरच कारवाई करण्यात आली आहे. अद्यापही मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील नामांकित गुटखा माफिया गळाला लागला नसल्याचे चित्र आहे. तेव्हा मुख्य सूत्रधार गुटखा माफियांना अटक का होत नाही यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments