कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना कार्यमुक्त करा : प्रहारचे धरणे आंदोलन

सोलापूर दि.(क.वृ.): कोरोना काळात मागील चार महिन्यापासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांनी कोरोना सर्वेक्षण, ट्रेसिंग, टोलनाके, क्वॉरंटाईन सेंटर, पोलीस सहाय्यक इत्यादी कामे प्रामाणिकपणे करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या १५ जूनच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे अन्यथा शुक्रवार दि. २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सचिन नागटिळक यांनी दिली.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद, शिक्षण चालू आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून, नवनवीन व्हिडिओ तयार करून पाठवणे, ऑनलाइन शिकवणे अशा विविध प्रकारे शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. एकाच शाळेतील बहुतांश शिक्षकांना ड्युटी दिलेली आहे.शालेय कामकाज पाहण्यासाठी शाळेमध्ये उपस्थित राहणेआवश्यक असताना मुख्याध्यापकांना ड्युटी देणे, महिला शिक्षकांना ड्युटी देणे, यापूर्वी काम केलेले असतानाही पुन्हा ड्युटी देणे, पती-पत्नी दोघांनाही ड्युटी देणे, ऑनलाईन तसेच ऑफलाइन कामासाठी शाळेत लिपिकाची आवश्यकता असताना शाळेतील लिपिक शिपाई यांना ड्युटी देणे, कोरोना कामात काही तांत्रिक अनुभव नसताना शिक्षकांना ट्रेसिंगचे काम देणे, क्वॉरंटाईन सेंटरला नाईट ड्युटी देणे, अपंग शिक्षकांना ड्युटी देणे, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या तसेच हृदय शस्त्रक्रिया झालेल्या तसेच विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या शिक्षकांना कोरोना ड्युटी देणे अशा शिक्षकांच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळे सोलापूर जिल्हा शहर व तालुक्यातील शिक्षकांना कोरोना कामकाजातून तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे.याबाबत प्रहार शिक्षक संघटनेने कोरोना ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, सोलापूर, मा. आयुक्त महानगरपालिका, सोलापूर तसेच मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जि. प. सोलापूर यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. २८/०८/२०२० रोजी दुपारी १२ ते ४ या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट, जिल्हा परिषद समोर, सोलापूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन नागटिळक यांनी दिली आहे. अन्यायग्रस्त शिक्षकांनी सदर आंदोलनास उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे शहराध्यक्ष राजेश काडादी, शहर सचिव राजकुमार देवकते, जिल्हा उपाध्यक्ष हणमंत चव्हाण, जिल्हा सहसचिव प्रताप दराडे, कोषाध्यक्ष रियाज अहमद अत्तार यांनी केले आहे.
0 Comments