इतिहासात प्रथमच उन्हाळी आवर्तन भागविणार तिसंगी तलावाची तहान.
तिसंगी सोनके तलावासह नीरा उजवा लाभक्षेत्रातील सर्व तलावे भरून घेणार :- आ. शहाजीबापू पाटील
सांगोला/प्रतिनिधी:-नीरा उजवा कालव्याच्या सुरु असणाऱ्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील तिसंगी सोनके तलाव 90 % भरून घेतला असून आजपासून चिंचोली तलाव, हलदहिवडी व महिम पाझर तलाव ही तलावे पूर्णपणे भरून घेण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी काल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तिसंगी तलावाच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच तिसंगी तलाव हे उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याने ९० टक्के भरून घेतले असल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गासाठी शेतीचा विकास करण्यास हि सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
सांगोला तालुका हा दुष्काळी तालुक्यांच्या यादीतील तालुका आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे तालुक्याला त्याच्या हक्काचे पाणी मिळवून दिले जात नव्हते. यामुळे शेतीचा विकास थांबला, पर्यायाने तालुक्याचा देखील विकास रखडला आहे. परंतु आमदार शहाजीबापू पाटील यांना त्यांच्या आमदारकीच्या पहिल्याच वर्षात सांगोला तालुक्यासाठी मंजूर असणाऱ्या सर्व योजनांचे पाणी १०० टक्के पूर्ण क्षमतेने तालुक्यात आणण्यास मोठे यश मिळविले आहे. यामध्ये सध्या सुरु असणाऱ्या नीरा उजवा कालव्याच्या उन्हाळी आवर्तनामधून तिसंगी सोनके तलावात पाणी सोडलेले आहे. वरुणराजाने साथ दिली व मोठा पाऊस पडला तर तलावातील पाणी व पावसाचे पाणी यामुळे तलाव फुटू नये म्हणून तिसंगी सोनके तलाव हा 90 टक्के भरून घेतला आहे. तसेच चिंचोली तलाव, हलदहिवडी व महीम पाझर तलाव देखील आजपासूनच भरून घेण्याचे आदेश आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रशासनास दिले आहेत.
तिसंगी तलावाची निर्मिती झाल्यापासून एकदाही उन्हाळी आवर्तनाचे पाणी तलावास मिळाले नव्हते. त्यामुळे तिसंगी तलावाच्या इतिहासात प्रथमच उन्हाळी आवर्तनाने तलावाची तहान भागविली जाणत आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी मोठी संधी सापडली असून यापुढील काळात देखील तालुक्याच्या हक्काचे सर्व पाणी तालुक्याला मिळवून दिले जाणार असल्याचा शब्द आ.शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे.
0 Comments