भूसंपादित जमिनींची त्वरित भरपाई द्याजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर, दि.३०(क.वृ.): भूसंपादन झालेल्या जमिनींची भरपाई त्वरित देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. यामुळे जिल्ह्यातील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच 554 कोटी रूपयांची भरपाई मिळेल. यामध्ये प्रामुख्याने माळशिरस, पंढरपूर या महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील भूसंपादनाच्या व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी सहभागी झाले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आठ ठिकाणी चौपदरीचे तर सार्वजनिक बांधकाम पाच ठिकाणी आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नऊ ठिकाणी दुपदरीच्या महामार्गाचे काम सुरू आहे.
श्री. शंभरकर म्हणाले, महामार्गांचे काम गतीने करा. भूसंपादन झालेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्या. पैसे वाटपाच्या बाबतीत समन्वयाने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घ्या. भूसंपादन आणि मंदिरांच्या ठिकाणी समस्या असतील तर संबंधितांशी बोलून प्रश्न तत्काळ निकाली काढा.
जिल्ह्यातील 275 गावातून 21 प्रकल्पांचे काम सुरू असून 61 हजार 459 जमीन मालक बाधित झाले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 56 हजार 936, सार्वजनिक बांधकाममध्ये 71 आणि राज्य रस्ते विकास महामंडळात 4452 बाधित शेतकरी खातेदार आहेत. भूसंपादन झालेल्या जमिनींसाठी 3407 कोटी 96 लाख रूपये एवढ्या रकमेची भरपाई देण्यात येणार आहे. आतापर्यंत 26 हजार 897 खातेदारांच्या बँक खात्यात 1919 कोटी 57 लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. 28 हजार 389 खातेदारांना 553 कोटी 47 लाख रूपये देण्याचे कामही वेगाने सुरू असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला 2464 कोटी 4 लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून 1916 कोटी 38 लाख रूपयांचे 26 हजार 872 खातेदारांना वाटप केले. 547 कोटी 66 लाख रूपये 28 हजार 343 खातेदारांच्या खात्यात जमा करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सार्वजनिक बांधकामकडे 9 कोटी रूपये अनुदान आले होते, त्यापैकी 25 खातेदारांना 3 कोटी 19 लाखांचे वाटप केले आहे. आणखी 5 कोटी 81 लाख रूपये हे 46 खातेदारांना वाटप करायचे आहेत.
0 Comments