फसव्या सरकारने शेतकरी व दुध उत्पादकांना वाऱ्यावर सोडले - चेतनसिंह केदार-सावंत बळीराजाला न्याय देण्यासाठी भाजप पुन्हा आक्रमक
सांगोला (प्रतिनिधी): राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये अनुदान द्या, प्रती लिटर दुधाला तीस रुपये खरेदी दर द्या आणि दूध भुकटीकरिता प्रती किलो 50 रूपये अनुदान द्यावे, यासाठी सोमवार 20 जुलै रोजी सांगोला तालुका भाजप महायुतीच्या वतीने तहसीलदार यांना दूध भेट व निवेदन देण्यात आले.
सत्तेवर येण्यापूर्वी फक्त शेतकरी हिताच्याच गोष्टी महाविकास आघाडीकडून केल्या जात होत्या. शासनाने 10 लाख लिटर दुध 25 रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात 7 लाख लिटर दुध खरेदी केले जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. परंतु सत्तेत आल्यानंतर या हिताच्या गोष्टी केवळ नावापुरत्या राहिल्या असून महाविकास आघाडी सरकारने आता दूध उत्पादक व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला.
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे दूध व्यवसाय डबघाईला आला आहे. दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली तसेच दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन 1 कोटी 50 लाख लिटरच्या आसपास होते. कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स आणि अन्य व्यवसाय जिथे दुग्धजन्य पदार्थांची गरज असते ते बंद आहेत. परिणामी 20 मार्च पासून पिशवी बंद दुधाचा खप 30 ते 35 टक्के पर्यंत खाली आलेला आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री 10 ते 15 टक्के पर्यंत खाली आलेली आहे.
शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.
राज्य शासनाने तातडीने दूध प्रश्नावर न्याय निर्णय न घेतल्यास राज्यभर 1 ऑगस्ट पासून भाजप महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवारी तहसीलदार योगेश खरमाटे यांना भाजप महायुतीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजप किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, आरपीआयचे (आठवले गट) तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, रासपचे सोमा मोटे, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, आरपीआय (आठवले गट) युवकचे जिल्हाध्यक्ष रामस्वरूप बनसोडे, भाजप शहराध्यक्ष आनंद फाटे, रयत क्रांती संघटनेचे भारत चव्हाण, प्रा.संजय देशमुख, नागेश जोशी, शंभू माने, वसंत सुपेकर, मानस कमलापूरकर, विशाल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
0 Comments