स्वस्त धान्य दुकान प्रकरणी आंदोलनाचा इशारा
पंढरपूर दि.२९(क.वृ.):- गुरसाळे ता.पंढरपूर येथील स्वस्त धान्य दुकानाच्या कामकाजात अनियमितता असून लॉकडाऊनच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे धान्य वाटप झाले नाही. लाभ धारकांच्या नावावर कमी धान्य देवून जास्त धान्य नोंदविल्याचा प्रकार निदर्शनास आले आहे याबाबत महिनाभरापुर्वी महसुल प्रशासनाकडे तक्रार केली आहे. चौकशी आधिकाज्यांनी अहवाल देवूनही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुरसाळे येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या दुर्लक्षामुळे सुमारे 60 टक्के लोकांच्या शिधापत्रिका संगणकीकृत करण्यात आल्या नाहीत. याबाबतची माहिती घेण्यासाठी गेल्यानंंतर दुकानदाराकडून अपमानास्पद वागणुक मिळते. दुकान उघडण्याची वेळ निश्चित नसल्याने अनेक लाभधारक धान्यापासून वंचित राहतात. कोरोना महामारीच्या काळात शासनाने अंत्योदय योजनेतील लाभधारकांना प्रती व्यक्ती 8 किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक लाभ धारकांना हे धान्य मिळाले नाही. तर काहींना कमी धान्य देवून त्यांची बोळवण करण्यात आली. धान्य दिल्यानंतर कोणतीही पावती दिली जात नाही. अशा प्रकारच्या तक्रारी ग्रामस्थांनी दि.05 एप्रिल 2020 रोजी तहसिलदार यांचेकडे केल्या होत्या. याबाबत तहसिलदारांनी पुरवठा निरिक्षक शिंदे यांची चौकशी आधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचेकडेही ग्रामस्थांनी जबाब देवून वरीलबाबी निदर्शनास आणुन दिल्या आहेत. सदर प्रकारास एक महिना होवून गेला तरी अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे दि.25 जुन 2020 पर्यंत संबंधीत दुकानदारावर कारवाई न झाल्यास दि.01 जुलौ 2020 रोजी गुरसाळे ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर उग्र आंदोलन करतील असे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे पाठविण्यात आले आहे.
सदर निवेदनावर सुधाकर कवडे, नानासाो कवडे, समाधान शेजाळ, अंकुश गायकवाड, रमेश कवडे, अशोक गवळी, अमोल कवडे, अमोल वाघमारे, शिवाजी शिंदे, अलका कवडे, सिंधुबाई वाघमारे, गणेश गोडसे, नवनाथ चव्हाण, विष्णु खरात,रेवण भोसले यांच्या सह्या आहेत.
0 Comments