Ads

Ads Area

पुणे विभाग नैसर्गिक आपत्‍तीवर मात करण्‍यास सज्‍ज

पुणे विभाग नैसर्गिक आपत्‍तीवर मात करण्‍यास सज्‍ज 


            पुणे विभागातील पुण्‍यासह सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍हे येणा-या नैसर्गिक आपत्‍तीशी मुकाबला करण्‍यास सज्‍ज असून गतवर्षी उद्भवलेली परिस्थिती पुन्‍हा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात येत आहे. मागील वर्षी सातारा, सांगली आणि कोल्‍हापूर या जिल्‍ह्यात अतिवृष्‍टी झाल्याने या वर्षी महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्‍य या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, गृह मंत्री अनिल देशमुख यांनी तसेच यापूर्वी उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागाचा आढावा घेवून आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या.
            विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी विभागातील तसेच जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्‍ह्यातील सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली.  सन 2019 मध्‍ये पुणे विभागातील 38 तालुकयातील 727 गावांमधील 2 लाख 6 हजार 452 कुटुंबे अतिवृष्‍टीमुळे बाधित झाली होती. पुणे विभागातील सांगली व कोल्‍हापूर जिल्‍ह्यांसाठी प्रत्‍येकी 2 एनडीआरएफ ( राष्‍ट्रीय आपत्‍ती निवारण पथक) टीम पुरविण्‍याबाबत विनंती करण्‍यात आली आहे. यंदा कोरोनाचे संकट असून नैसर्गिक आपत्‍ती उद्भवल्‍यास सक्षमपणे मुकाबला करता यावा, यासाठी काटेकोर नियोजन करण्‍यात आले आहे.
            पुणे विभागातील सर्व जिल्‍ह्यांच्‍या व महानगरपालिकांच्‍या मान्‍सूनपूर्व आढावा बैठका झालेल्या आहेत. पुणे जिल्‍ह्याची 20 मे रोजी, सातारा जिल्‍ह्याची 30 एप्रिल रोजी, सांगली जिल्‍ह्याची 6 मे रोजी, सोलापूर जिल्‍ह्याची 15 मे रोजी आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्याची 27 एप्रिल रोजी मान्‍सूनपूर्व आढावा बैठक झाली. पुणे महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांची 21 मे रोजी, पिंपरी-चिंचवड मनपाची 17 मे रोजी, सांगली-मीरज-कूपवाड मनपाची 30 एप्रिल रोजी, सोलापूर मनपाची 21 एप्रिल रोजी तर कोल्‍हापूर मनपाची 12 मे रोजी बैठक झाली. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील तसेच महानगर पालिकेकडील नियंत्रण कक्षामध्‍ये आवश्‍यक ती साधन सामग्री उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. पुणे जिल्‍ह्यात 8 बोटी, 40 लाईफ जॅकेट, 40 लाईफ बॉईस, 7 सर्च लाईट तर रोप 16 आहेत. सातारा जिल्‍ह्यात 5 बोटी, 40 लाईफ जॅकेट्स 40 लाईफ बॉईस, 30 सर्च लाईट तर रोप 10 आहेत. सांगली जिल्‍ह्यात 51 बोटी, 65 लाईफ जॅकेट, 46 लाईफ बॉईस, 25 सर्च लाईट, 34 सेल्‍फी हेल्‍मेट, 58 मेगा फोन तर फ्लॉटींग पंप 20 आहेत. सोलापूर जिल्‍ह्यात 3 बोटी, 44 लाईफ जॅकेट, 29 लाईफ बॉईस, 40 सर्च लाईट, 40 सेल्‍फी हेल्‍मेट, 30 मेगा फोन तर फ्लॉटींग पंप 2 आहेत. कोल्‍हापूर जिल्‍ह्यात 17 बोटी, 200 लाईफ जॅकेट, 306 लाईफ बॉईस, 20 सर्च लाईट, 100 रोप, 50  सेल्‍फी हेल्‍मेट, 21 मेगा फोन तर फ्लॉटींग पंप 7 आहेत. सांगली तसेच कोल्‍हापूर जिल्‍ह्याला यांत्रिकी बोटी, फायबर बोटी सर्व साहित्यासह खरेदी करण्‍यास निधी उपलब्ध करुन देण्‍यात येणार आहे. रिअल टाईम डाटा सिस्‍टीम (आरटीडीएस) यंत्रणा 30 जून पूर्वी कार्यान्वित करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. एनडीआरएफ ( राष्‍ट्रीय आपत्‍ती निवारण पथक) टीमच्‍या दोन पथकांपैकी एक सांगलीसाठी व एक इस्‍लामपूर येथे 1 जुलै ते 15 ऑगस्‍टपर्यंत (25 जवान व 5 बोटीसहीत) ठेवण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे.  गतवर्षीच्‍या पुराचा विचार करुन धरणातील पाणी साठा आणि विसर्ग या संदर्भात आवश्‍यक तो निर्णय शासन स्‍तरावर घेण्‍यात येणार असल्‍याने त्‍यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
            पुणे विभागातील जिल्‍ह्यांमध्‍ये मागील वर्षी झालेला पाऊस आणि पावसाची सरासरी (कंसात) पुढीलप्रमाणे होती. पुणे जिल्‍हा 1116.77 मि.मी. (सरासरी 752.78मि.मी.), सातारा 1330.54 मि.मी. (834.26 मि.मी.), सांगली  710.97 मि.मी. (सरासरी 418.41 मि.मी.), सोलापूर 331.12 मि.मी. (सरासरी 488.81 मि.मी.) आणि कोल्‍हापूर 2042.83 मि.मी. (सरासरी 1772.37 मि.मी.)
            कृष्‍णा खोरे महामंडळातील धरणांची साठवणूक क्षमता (टीएमसी)  व 6 जून 2020 रोजी असलेला धरणाचा साठा (कंसात) पुढीलप्रमाणे आहे. कोयना 105.25 टीएमसी (28.62 टीएमसी), धोम 13.50 टीएमसी (3.69 टीएमसी), कण्‍हेर 10.10 टीएमसी (2 टीएमसी), वारणावती 27.52 टीएमसी (4.81 टीएमसी), दुधगंगा 23.98 टीएमसी (6.01 टीएमसी) राधानगरी 7.77 टीएमसी (0.73 टीएमसी), उरमोडी 9.96 टीएमसी (5.79 टीएमसी)आणि तारळी 5.85 टीएमसी (2.29 टीएमसी) इतका आहे.
            भीमा खोरे महामंडळातील धरणांची पाणी साठवणूक क्षमता आणि (कंसात) 6 जून 2020 रोजी उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. वरसगांव 12.82 टीएमसी (2.74 टीएमसी), पानशेत 10.65 टीएमसी (3.17 टीएमसी), पवना 8.51 टीएमसी (2.95 टीएमसी), मुळशी 18.47 टीएमसी, (2.17 टीएमसी), चासकमान 7.58 टीएमसी (1.24 टीएमसी), भामा आसखेड 7.67 टीएमसी (2.71 टीएमसी), भाटघर 23.50 टीएमसी (6.51 टीएमसी), निरा देवघर 11.73 (2.57 टीएमसी), वीर 9.41 टीएमसी (2.93 टीएमसी), माणिकडोह 10.17 टीएमसी (0.84 टीएमसी), डिंभे 12.49 टीएमसी (3 टीएमसी), घोड 5.47 टीएमसी (निरंक),उजनी 53.57 टीएमसी (उणे 9.47 टीएमसी).
            मागील वर्षी अतिवृष्‍टीमुळे सांगली जिल्‍ह्यात 4  तालुकयातील 104 गावांमधील 87 हजार 909 कुटुंबे बाधित झाली होती. कोल्‍हापूर जिल्‍ह्यात 12 तालुक्‍यातील 386 गावांमधील 1 लाख 2 हजार 557 कुटुंबे, सातारा  जिल्‍ह्यात 5  तालुकयातील 65 गावांमधील 1 हजार 976 कुटुंबे, सोलापूर जिल्‍ह्यात 7 तालुकयातील 102 गावांमधील 6 हजार 396 कुटुंबे तर पुणे जिल्‍ह्यात 10 तालुकयातील 70 गावांमधील 7 हजार 614 कुटुंबे बाधित झाली होती.
            अतिवृष्‍टीचा गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा सर्व यंत्रणा सज्‍ज आणि दक्ष आहेत. कोरोनाचे संकट असले तरी महसूल, पोलीस, आरोग्‍य, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग या सर्व यंत्रणा परस्‍पर समन्‍वय साधून नैसर्गिक आपत्‍तीवर मात करण्‍यात यशस्‍वी होतील, असा विश्‍वास आहे.
                                                                  राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close