ट्रूनॅट मशीनव्दारे होणार कोरोना विषाणूची चाचणी
महापालिकेच्या चाचणी केंद्रास मंजुरी – डॅा. मंजिरी कुलकर्णी
सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ट्रूनॅट मशीनव्दारे कोरोना विषाणूची चाचणी घेतली जाणार आहे. या केंद्रास आयसीएमआरची मान्यता नुकतीच मिळाली, असल्याची माहिती महापालिकेच्या दाराशा प्रसूती केंद्रातील डॅा. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली आहे. या मशीनच्या सहाय्याने दररोज 25 चाचण्या करण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सोलापूर महानगरपालिकेला राज्य शासनाकडून हे मशीन प्राप्त झाले आहे. लष्कर परिसरातील दाराशा प्रसूतीगह येथे या मशीनव्दारे चाचणी घेतली जाते. प्रतिबंधित क्षेत्रामधील प्रसूती जवळ आलेल्या महिलांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे का, याची तपासणी करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. या मशीनव्दारे चाचणीचा अहवाल एका तासात उपलब्ध होतो. मशीनव्दारे चाचणी केलेला अहवाल नकारात्मक आला तर संबंधित व्यक्तिला कोरोना विषाणूची लागण झालेली नाही हे ठोसपणे सांगता येते. मात्र चाचणी अहवाल सकारात्मक आला तर संबंधित व्यक्तिची पुन्हा चाचणी घेतली जाते. ही चाचणी वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत केली जाते.
गर्भवतींना कोरोना विषाणूची बाधा लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मशीनच्या सहाय्याने प्रामुख्याने गर्भवतींची चाचणी केली जाणार आहे. सध्या सोलापूर शहरात तीन प्रयोगशाळेत चाचणी होते. आणखी दोन प्रयोगशाळांना मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments