वरवडे येथील सहा लाख रुपयांच्या मिरची चोरीचा छडा;मुद्देमालासह दोन आरोपींना अटक
टेंभुर्णी [ प्रतिनिधी ] -पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोल नाका येथून लाल मिरचीच्या मालट्रक चालकास कोयत्याचा धाक दाखवून सिने स्टाईल ट्रक हायजॅक करून त्यातील सहा लाख रुपये किमतीची मिरची चोरी प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांना अवघ्या तीन दिवसात चोरीचा छडा लावून दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले असून अद्याप एक आरोपी फरार आहे.
गोविंद सिद्धेश्वर घुगे (वय-२०) व झुबेर मकबूल खान (वय-२७) दोघे रा.लऊळ, ता.माढा अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि.२२ मे रोजी विजयवाडा येथून नंदकुमार ट्रेडिंग कंपनी,मार्केट यार्ड पुणे यांच्यासाठी लाल मिरची ३०७ पोती (प्रत्येकी ३६ किलो) मालट्रक (क्र-एमएच १२/एनएक्स ४२९४) या ट्रकमध्ये भरून चालक बळीराम नथुनी राजभर रा.देहूरोड पुणे हा विजयवाडा- हैदाबाद-उमरगाव-सोलापूर मार्गे पुण्याकडे निघाला होता.दि.२४ मे रोजी पहाटे ३.३० वा.टेंभुर्णी जवळील वरवडे टोलनाका पास करून प्राथर्विधीसाठी थांबला होता.यानंतर त्याने पुन्हा ट्रक चालू केला तेव्हा २५ ते ३० वयोगटातील तीन अनोळखी तरुण ट्रकच्या केबिनमध्ये जबरदस्तीने चढले.त्यातील दोघांनी ट्रकचालकास ड्रायव्हर सीटवरून बाजूला ओढून मारहा केली.तर एकाने ट्रक चालू केला.ट्रक चालू असतानाही दोघे ट्रक चालकास मारत होते.चालकाने प्रतिकार करताच दोघांपैकी एकाने कोयत्याने चालकाच्या हातावर वार केला.त्यास जीवे मारण्याची धमकी दिली व लुंगीने बांधून मागील सीटवर झोपवले.याच दरम्यान मारहाण करणाऱ्यानी ट्रक चालकाकडील २० हजार रुपये रोख व १० हजार रुपये किंमतीचा रियलमी कं.मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता.
यानंतर त्या तिघांनी ट्रक महामार्ग सोडून इतर मार्गाने नेऊन एका ठिकाणी थांबवला.यावेळी एकजण ट्रक चालकाजवळ थांबला व इतर दोघांनी ट्रकमधील काही मिरची पोती खाली उतरविली व पुन्हा ट्रक आडमार्गाने घेऊन जाऊ लागले.सकाळी ८.३० वा सुमारास ट्रक चालकांच्या कंपनीचा मारूती पुंडलीक शर्मा हा दुसरा ट्रक चालक ट्रक घेऊन पळवून नेलेल्या ट्रकचा पाठलाग करत आला.तो ओरडून ट्रक थांबवण्यास सांगत होता.यामुळे चोरट्यांना शंका आल्याने त्यांनी ट्रक थांबवून ते मागून असलेल्या मोटारसायकल वरून पसार झाले होते.
जीपीआरएस सिस्टममुळे मालट्रकचा पाठलाग :
दरम्यान रिहान रोड करिअर्स देहूरोड पुणे यांच्याकडे एकूण साठ मालट्रक असून प्रत्येक ट्रकला जीपीआरएस सिस्टम असल्याने त्यांना ट्रकचे लोकेशन समजत असे.घटने दिवशी ट्रक हायजॅक केल्यानंतर तो महामार्ग सोडून पुण्या ऐवजी उलट दिशेने आडमार्गाने जात असल्याचे व चालक याचा मोबाईल बंद असल्याने मालट्रक मालकाने पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकास त्या मार्गाची माहिती देऊन पाठलाग करण्यास सांगितले.यामुळे सकाळी ८ वा.सुमारास बार्शी तालुक्यातील सेंद्रि पाटीजवळ ट्रक पकडण्यात आला होता.तसेच मालक व मॅनेजर ही तेथे पोहचले.यानंतर ट्रकचालक बळीराम नथुनी राजभर यांने टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये तीन आज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम,पोहेकॉ बिरुदेव पारेकर,पोना दत्ता वजाळे,महंमद शेख,प्रसाद काटे,विनोद पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील नितीन गोरे व सागर गवळी यांना पथकात सामील करून तपासास सुरुवात करण्यात आली.
सपोनी मगदूम यांनी ज्या मार्गावरुन ट्रक नेला तो मार्ग वरवडे,भेंड,रोपळे,लऊळ, बावी,कुर्डुवाडी पिंजून काढीत असताना पोलिसांना बावी येथील निर्जन पडीक रानातील प्रशांत नामदेव मोरे यांच्या शेतातील शेततळ्यात लपवून ठेवलेली मिरचीची सहा लाख रुपयांची सर्व ११८ पोती मिळून आली.ती पोलिसांनी जप्त केली.नंतर लऊळ भागात अजूबाजुला चौकशी केली असता संशयित चोरट्याची पोलिसांनी माहिती मिळाली.यामुळे पोलिसांनी गोविंद सिद्धेश्वर घुगे यास कुर्डुवाडी कृउबा समितीच्या आवारात २७ मे रोजी रात्री ७.४५ वा.फरार होण्यासाठी कोल्हापूरला जाणाऱ्या मालट्रकमध्ये झोपलेला असताना पकडले तर झुबेर खान यास तो पत्नीस भेटण्यासाठी कुर्डुवाडी येथे येणार असल्याचे समजताच त्यास ही शिताफीने सकाळी ८.४५ वा.पकडून जेरबंद करण्यात आले.अवघ्या तीन दिवसात आरोपीना पकडण्यात असल्याने पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हि कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनानुसार व पोनि राजकुमार केंद्रे यांच्या नेतूत्वाखाली करण्यात आली.
अद्याप आणखी एक मुख्य सूत्रधार फरार असून या गुन्ह्यात कोणाचा समावेश आहे का? याचा तपास सपोनि राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.
0 Comments