Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोल्यात भाजपचे सरकारविरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन

सांगोल्यात भाजपचे सरकारविरोधात महाराष्ट्र बचाओ आंदोलन
 
तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन



सांगोला (तालुका प्रतिनिधी): कोरोना महामारीत प्रभावी उपाययोजना व प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्यामुळे आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी सांगोला भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, यांनी काळे मास्क लावून फलक उंचावून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तालुक्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत:च्या घराच्या प्रांगणातच सुरक्षित अंतराचे पालन करून तोंडाला काळे मास्क लावून, काळी रिबन, काळे कपडे परिधान करून निषेध आंदोलन केले.
      कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे. सांगोल्यात भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभे राहून काळ्या फिती, काळे झेंडे, मास्क लावून, सोशल डिस्टन्सचा नियम पाळून, फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला. चेतनसिंह केदार-सावंत यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी काळे मास्क लावून फलक उंचावून राज्य सरकारचा निषेध नोंदवला.
       कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यामध्ये महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. सर्वसामान्य जनतेला रोजच्या जेवण्याची भ्रांत पडली असताना आघाडी सरकारने कोट्यवधीच्या घोटाळ्यातील वाधवानला परगावी जाऊ देण्यास परवानगी देणार्‍या अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट दिली. बदल्या न करण्याचा शासन निर्णय जारी केलेला असताना सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र मोक्याच्या ठिकाणी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. 
       याप्रसंगी चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले की, राज्यातील पोलिसांवरील हल्ल्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असताना राज्य सरकार शांत आहे. राज्यातल्या शेतकर्‍यांची मोठया प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे. केंद्र सरकारने आधारभूत किंमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यानंतर सुद्धा राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही. शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज तातडीने उपलब्ध करून देणे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई सुद्धा देण्याची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत राज्य सरकारने आपल्या जनतेसाठी कुठल्याही स्वरूपाचं पॅकेज जाहीर केले नाही. रेशनवर मोफत धान्य दिले नसून एप्रिलचे धान्य न देता मे महिन्यामध्ये हे धान्य द्यायला या सरकारने सुरुवात केली. यामुळेच गरिबांचे मध्यमवर्गीयांचे, हातावर पोट असलेल्या लोकांचे अतोनात हाल चालू आहेत. 
         संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लोकांना आजही मिळत नाहीत. पीपीई किटसची उपलब्धता नाही. राज्यातील ठिकठिकाणची विलगीकरण केंद्रांची स्थिति भयावह आहे, तेथे जेवण, पाणी अशा प्राथमिक सोयीसुविधांचा पुर्णपणे अभाव आहे. राज्याच्या अंतर्गत जिल्ह्याजिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता कुठल्याही प्रकारची सोय राज्य सरकारने गेल्या तीन महिन्यात केली नाही. 
      महाराष्ट्रातील जनतेसाठी आर्थिक पॅकेज घोषित करा, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, घरकामगार, बारा बलुतेदारांना भरघोस आर्थिक मदत करावी. सरसकट संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, विज बिल माफ करावे, शाळेची फी रद्द करावी, शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना धान्य द्यावे, शिधापत्रिकेवर साखर, किराणा, डाळ देण्यास सुरुवात करावी. 
      विद्यार्थी, महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोफत प्रवासाची सोय करावी. खाजगी रुग्णालयात सर्वांना उपचार मोफत मिळावेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांचे पैसे त्वरित लाभार्थ्यांना मिळावेत. शेतकऱ्यांना बी-बियाणे खते मोफत उपलब्ध करून द्यावीत. सरकारने तीन महिन्याचे घरभाडे माफ करावे अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments