निरेच्या लाभक्षेत्रातील शेतीला मोफत पाणी मिळावे - चेतनसिंह केदार-सावंत
संकटकाळात पाणी बिलाची रक्कम शासनाने भरण्याची मागणी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सध्या सांगोला तालुक्यात निरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व शेती क्षेत्राला मोफत पाणी द्यावे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चिंचोली तलाव भरून द्यावा आणि पाणी बिलाची रक्कम राज्य शासनाने भरावी अशी मागणी तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने शेतीमालाला दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आलेला संकटाचा सामना करत शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत आहे. सध्या सांगोला तालुक्यात निरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर सोसायट्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणी अर्ज दिले आहेत. मात्र यंदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने सरकारने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतीला मोफत पाणी द्यावे व पाणी बिलाची रक्कम राज्य शासनाने भरावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली आहे.
जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला दिलासा संकटकाळात देण्याची गरज आहे. तसेच काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निरेच्या पाण्याने चिंचोली तलाव भरून द्यावा. निरेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेततळी, पाझर तलाव व ओढ्यातून पाणी सोडून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी आधार द्यावा. निरेचे मोफत पाणी मिळाले तर लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके व फळबागांना जीवदान मिळणार आहे.
आर्थिक संकट असले तरी उसनवारी करून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मशागतीची सर्व कामे उरकून घेतली आहेत. गेल्या वर्षी पाण्याअभावी खरीप हंगाम वाया गेला होता. संकटकाळात खरीप हंगाम पदरात पडण्यासाठी शेती क्षेत्राला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. सध्या सांगोला तालुक्यात निरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे निरेच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतीला मोफत पाणी मिळावे, चिंचोली तलाव भरून द्यावा, शेततळी व पाझर तलाव भरून द्यावेत आणि सदर पाणी बिलाची रक्कम शासनाने भरावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली आहे.
0 Comments