सर्व समाजाचा विचार केल्यानेच बाबासाहेब युगपुरूष ठरले : कांबळे ; लोकमंगलकडून प्रथम फेसबूक लाईव्ह व्याख्यानमाला
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहताना जगातील सर्व संविधानाचा अभ्यास केला. यामध्ये सर्व समाज घटकांचा समावेश केला. सर्वांना न्याय आणि समान न्याय हे सूत्र त्यांनी घटनेतून दिले. गेली 70 वर्ष याच राज्य घटनेवर आपला देश चालू आहे. बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात काम करताना करताना सर्व समाजाचा विचार केला, त्यामुळेच ते युगपुरूष ठरले, असे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉर्मस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पद्मश्री मिलींद कांबळे यांनी केले.
लोकमंगल फौंडेशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट संचलित लोकमंगल जीवक हॉस्पिटल आयोजित बैद्धीक व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्याख्यानमालेचे हे यंदाचे 9 वे वर्ष आहे. यंदा कोरानोच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने यंदा ही व्याख्यानमाला फेसबूक लाईव्ह घेण्यात आली, त्यावेळी मिलिंद कांबळे बोलत होते.
कांबळे पुढे म्हणाले, कोरोनामुळे यंदा आंबेडकर जयंती ही साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. बाबासाहेबांचे शालेय जीवन खडतर गेले. मात्र त्यांनी सर्व कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी परेदशात शिक्षण घेतले. तेथून आल्यावर त्यांनी देशाची सेवा सुरू केली. हा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. बाबासाहेब मोठे अर्थतज्ज्ञही होते. भारतीय चलनाचा विकास कसा झाला याचा इतिहास आंबेडकरांनी लिहला आहे. आर्थिक विचारातही त्यांची मूलभूत चिंतन केले. त्याचे दूरगामी परिणाम आज आपल्याला दिसत आहेत, असेही ते म्हणाले.
आंबडेकर यांनी स्वतः उच्चशिक्षण घेतले. त्यांनी त्या शिक्षणाचा वापर समजासाठी केला. गोरगरीब, कष्टकरी शिक्षण मिळावे म्हणून अनेक पिपल्स एज्युकेशन सोसायटी अनेक ठिकाणी उभी केली. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. त्यांनी सामाजिक समतेसाठी अनेक लढे उभारले. यासाठी समता सैनिक दल स्थापन केला. घटनेने जे राजकीय आरक्षण दिले आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा म्हणून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाचीही स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातीच्या तरूणांमध्ये शिक्षणाद्वारे एक विश्वास निर्माण केला. या तरूणांच्यावर जोरावर भारत महासत्ता होईल, यात शंका नाही, असेही कांबळे म्हणाले.
चायनापासून सावध राहण्याचा सल्ला बाबासाहेबांनी दिला होता
आज कोरोनामुळे देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे कारण चायना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चायनापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. चायना हा हुकमशाही तर भारत लोकशाही देश आहे. भारताने लोकशाही देशाबरोबरच चांगले संबंध ठेवावेत, असा संदेश दिला होता. जगाची इकॉनॉमी कोलमडली आहे. त्यामुळे आता चायनाला पर्याय म्हणून भारत देश राहिल, असेही कांबळे म्हणाले.

No comments:
Post a Comment