देवेंद्र फडणवीसांनी लिहिले उद्धव ठाकरेंना पत्र, वाचा, काय लिहिले आहेत या पत्रात
मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडित होण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. देशासह राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर कार्यरत आहेत. आज राज्याच्या मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोरोंच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील खबरदारी आणि उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चा केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधले आहे.
राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत . केंद्र सरकारने एक महिन्यांचे धान्य रेशनमार्फत मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आणि त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना सुद्धा त्याच्या वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे त्यामुळे यात आपण स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विविध विषयांकडे लक्ष वेधले आहे. देशभरातील सुमारे १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनासुद्धा धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सुद्धा असा निर्णय घेणे सहज शक्य आहे. त्यानुसार केंद्र सरकारने कोटा उपलब्ध दिल्याप्रमाणे प्रत्येकाला महिन्यांचे धान्य त्वरितापलब्ध करून दयावे, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, त्याचे आधारकाई प्रमाण मानून त्याना धान्य उपलब्ध करून दयावे तसेच ज्याच्याकडे दोन्ही नाही अश्यांचे यादी तयार करून ती यादी प्रमाणित करून त्यांनाही धान्य सहज उपलब्ध करून देता येईल. असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.
त्याचप्रमाणे, मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच लॉकडाऊनच्या काळातील परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. रुग्णालयात प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर , नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षा उपाययोजनाचा तुटवड्याच्या बाबी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. या बाबत ही त्वरित उपाय योजना करण्याची नितांत गरज आहे . मात्र अद्यापही याबाबतचे योग्य त्या उपाययोजना, सोयीसुविधा कार्यन्वित न झाल्याने आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान त्यांनी या पत्रामधून तबलिग जमातीच्या बेजाबदार वर्तणुकीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. तबलिगमधून आलेले लोक महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यातही गेले आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव अधिक झपाट्याने होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व मुबईमध्ये वाढती संख्या ही अत्यंत चिंतेची बाब आहे . त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई आपण करावी अशी विनंती यानिमित्त करतो. अशी विनंतीही फडणवीस यांनी या पत्राद्वारे केली आहे.

0 Comments