भाजप खा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरोधात FIR दाखल
सोलापूर : भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींनी लोकसभा निवडणुकीत खोटे जातप्रमाणपत्र दिल्ल्याबद्दल त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून या प्रकरणी आज जयसिद्धेश्वर स्वामींविरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूरमधील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, यावेळी न्यायालयाने १५६/३ प्रमाणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपली जात बेडा जंगम असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जातपडताळणी समितीने घेतला आहे. हिंदू लिंगायत असतानाही स्वामींनी बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप तक्रार दाखल करणार्यांनी केला होता. या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर यामध्ये जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुरावा म्हणून दिलेला दाखला संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आले. जातीच्या दाखल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेणाऱ्या समितीचं काम दबावाखाली करत असल्याचे जयसिद्धेश्वर स्वामींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मात्र, जिल्हा जात पडताळणी समितीने स्वामींचा अर्ज फेटाळून लावला. दक्षता समितीने अहवाल आपल्याला मान्य नसून आपण उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं स्वामींच्या वकिलांनी सांगितले. जयसिद्धेश्वर स्वामी यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. या प्रकरणी ते उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.
0 Comments