Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री आव्हाड यांच्याकडून विकासाला आणखी गती मिळेल ;कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शुभेच्छा

पालकमंत्री आव्हाड यांच्याकडून विकासाला आणखी गती मिळेल ;कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शुभेच्छा


       सोलापूर दि. 31 :  सोलापूरच्या विकासाला नूतन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड आणखी गती देतील, असे कामगार तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सांगितले. सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने  करण्यासाठी श्री. आव्हाड यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी सांगितले.

          सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची आज नियुक्ती करण्यात आली. श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती केली होती.

          पालकमंत्री पदाच्या गेल्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जिल्हा विकास आराखडयात भरीव वाढ करुन घेण्यात यशस्वी ठरलो. जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न केले,  असे श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

          सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस यांनी केलेल्या चांगल्या कामाचे हे फलित आहे. विधीमंडळाचे अधिवेशन आणि काही वैयक्तिक कारणास्तव मला सोलापूरला येता आले नाही. मात्र कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजना, आवश्यक असणारा निधी, शासनस्तरावरील विविध मंजूरी याबाबत तत्काळ निर्णय घेतले. व्ही.सी. द्वारे,  दूरध्वनीद्वारे आढावा घेऊन समस्यांवर निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दिपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना देत होतो, असे श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

          कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने उभी केलेली यंत्रणा कौतुकास्पद आहे. 2578 इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्ष, 369 आयसोलेशन कक्ष उभे केले. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात व्हायरस रिसर्च ॲन्ड डायग्नोस्टीक लॅबोरेटरी विकसित करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा विकास निधीतून वैद्यकीय सामग्री खरेदी करण्यासाठी 3 कोटी 73 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यामधून व्हेंटीलेटरसह आवश्यक वैद्यकीय सामग्री खरेदी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

          माझ्याकडे कामगार विभाग आहे. सोलापूर नगरी कामगारांची नगरी म्हणून प्रसिध्द आहे. यापुढे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझे सोलापूरकडे लक्ष असेल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री पदाच्या कालावधीत मला सोलापूरचे नागरिक, सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिकांचे सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्याकडून भरपूर प्रेम आणि सहकार्य मिळाले. प्रशासकीय अधिकारी, प्रसार माध्यमे आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे चांगले सहकार्य मिळाले. याबद्दल मी सर्वाचा आभारी आहे, असेही ते म्हणाले.

          कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा. घरातच थांबा. आरोग्य विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, अशी सोलापूरच्या नागरिकांना माझी आग्रही आणि कळकळीची विनंती आहे, असेही  श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले. 
Reactions

Post a Comment

0 Comments