आईचे औषध आणण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच बसले फटके.....
सोलापूर : आजारी आईची औषधे आणण्यासाठी मेडिकलला निघालेल्या पोलिस कर्मचारी हरिकृष्ण चोरमुले यांना नाकाबंदीमध्ये असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडे सात सुमारास होटगी स्टेशन परिसरात घडली.पोलिस शिपाई चोरमुले हे सोलापूर शहर पोलिस मुख्यालयालात सेवेत आहेत. रविवारी त्यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची आई होटगी स्टेशन येथे राहण्यास आहे. चोरमुले हे आईला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर आईच्या आजारपणाची औषधे आणण्यासाठी पोलिस कर्मचारी चोरमले हे शहराच्या दिशेने दुचाकीवरून येत होते. त्यावेळी होटगी स्टेशन येथे नाकाबंदीला असलेले पोलिस उपअधीक्षक संतोष गायकवाड यांनी काहीच चौकशी न करता थेट मारहाण केली, असे चोरमुले यांचे म्हणणे आहे.यासंदर्भात वळसंग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर चोरमुले यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन करून घटनेची माहिती कळवली. तसेच शहर पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर ते उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. याबाबत पोलिस उपअधीक्षक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तसे काही झाले नाही,असे सांगून अधिक बोलणे टाळले.
0 Comments