संचारबंदीच्या कालावधीत नागरीकांनी घराबाहेर पडू नये उपविभागीय पोलीस अधिकारी- डॉ.सागर कवडे
पंढरीत संचारबंदीचे उल्लंघन:29 जणांवर कारवाई
पंढरपूर -30- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरीकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रशासन प्रशासन सज्ज् आहे. नागरीकांनी अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी केले आहे.
संचारबंदी लागू असताना देखील काही नागरीक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मात्र नागरीकांकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पंढरपूरातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत विविध भागात नागरीक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता 29 नागरीकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कवडे यांनी दिली आहे.
कोरोना रोगाच्या आपत्तीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लॉक डाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. करोना हा संसर्गजन्य रोग असून सामाजिक संपर्क टाळणे हे संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरीकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करुन, संचारबंदीच्या काळात घरातच थांबून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी केले आहे.
0 Comments