Hot Posts

6/recent/ticker-posts

डावखरे, लाचारीची निरंजनं सावकाश ओवाऴा

डावखरे, लाचारीची निरंजनं सावकाश ओवाऴा 


सध्या राज्यभरात कोरोनाच्या विषाणूची दहशत पसरलेली आहे. सामान्य माणूस कोरोनाच्या दहशतीखाली वावरतो आहे. काय करावं ? काय काऴजी घ्यावी ?कोरोनाला रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात ? याबाबत बरेचसे समज-गैरसमज आहेत. सरकारी पातऴीवर अतिशय चांगल्या पध्दतीने काम चालू आहे. सगऴ्या यंत्रणा सतर्क आहेत. सर्वांनी मिऴून या संकटाचा सामना करण्याची गरज असताना भाजपाचे निरंजन डावखरे यांनी राजकीय राग आऴवण्यास सुरूवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे आपण किती निष्ठावंत आहोत हे दाखवण्यासाठी ते निष्ठेचा राग आऴवत आहेत. त्यासाठीच त्यांनी लाचारीची निरंजनं ओवाऴायला सुरूवात केली आहे. निरंजन डावखरेंनी स्वत:च्या लाचारीची निरंजनं सावकाश ओवाऴावीत. संपुर्ण राज्य कोरोनाशी एकदिलाने झगडत असताना देवेंद्र फडणवीसांच्या बुडाखालील या पिलावऴींनी तथाकथीत निष्ठेचे आणि लाचारीचे राजकारण करणे योग्य नाही. मुऴातच ही ती वेऴ नाही. कोण लायक आणि कोण नालायक ? हे ठरवण्याची ही वेऴ नाही. सर्वांनी पक्ष, गट, तट, मतभेद विसरून एकदिलाने या संकटाचा सामना करण्याची गरज आहे. गटा-तटाचे व पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे.खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही तेच सांगितले आहे. राज्यासमोर देशासमोर कोरोनाचे संकट मोठे आहे. यात राजकारण न आणता या संकटाचा मुकाबला सगऴे मिऴून करूया ! असे आवाहनही त्यांनी केले आहे. पण लाचारीची आणि चाटूगिरीची उबऴ आलेल्या निरंजन डावखरेंना ती दाबून धरता येईना. कधी संधी मिऴते आणि मी माझी निष्ठा सिध्द करतो अशी अवस्था त्यांची झाली असावी. या अधिरतेत त्यांचा विवेक संपल्याने त्यांनी परस्थितीचा विचार न करता उचलली जिभ आणि टाऴ्याला लावली. बाटगा अधिक कडवा असतो या उक्तीप्रमाणे निरंजनं आपल्या निष्ठा दाखवू पहात आहेत. राष्ट्रवादीत संधी साधून भाजपात बेडूकउडी मारलेल्या डावखरेंना अचानक देवेंद्र फडणवीसांची महानता आठवण्याचे कारण राजकीय आहे. ते तटस्थ, निस्वार्थपणे बोलले असेत तर समजून घेता आले असते. उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे अतिशय संयमाने परस्थिती हाताऴत आहेत. उध्दव ठाकरे कुठेच प्रसिध्दीचा डामडौल न करता, राजकीय दृष्टीकोन न ठेवता खुप चांगले काम करत आहेत. स्वत: समोर येवून परस्थिती हाताऴत आहेत, परस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांच्यातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. ते लोकांच्या मनात घर करत आहेत. महाराष्ट्राच्या मनाला ते भावत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंची स्वत:ची आई मृत्यूशी झुंज देत असताना तो माणूस राज्याचे दुखणे निस्तरतो आहे. दिवस-रात्र कोरोनाच्या परस्थितीचा, त्यामुऴे उद्भवलेल्या संकटाचा मुकाबला करतो आहे. स्वत:च्या आईला न वेऴ देता ते इकडे वेऴ देत आहेत. हे खुप कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे अतिशय चांगल्या पध्दतीने काम करत आहेत. अशावेऴी कौतुक करायची दानत नसेल तर नका करू पण किमान बाकीचा फालतूपणा तरी नका करू. राजकीय हलकटपणा तरी करू नका. लाचारीचा धडा पाठ केलेल्या निरंजन डावखरेंनी याचे किंवा राज्यासमोरील परस्थितीचे भान न ठेवता "आज देवेंद्र फडणवीस पाहिजे होते. उध्दव ठाकरे शुन्य आहेत !" असे वक्तव्य केले आहे. यातला राजकीय चालूपणा खटकल्याशिवाय राहत नाही. उध्दव ठाकरे चांगले नसतील तर येणार्या काऴात त्यांचे ऑडीट जनता करेलच पण सध्य स्थितीत अशा तुलना करणे, यात राजकीय नजरेने पहाणे मुर्खपणाचे आहे. कोरोना हे संकट देशावरचे, राज्यावरचे आहे. मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या देश हिताच्या भूमिका घेतील त्या भूमिका आणि निर्णयाबरोबर सर्वांनी असणे गरजेचे आहे. त्यांचा निर्णय हा सर्वांचा निर्णय असल्याची भूमिका ठेवायला हवी. संकटकाऴात आप-आपसातील मतभेद, मनभेद गाडायला हवेत. निरंजन डावखरे सारख्या नेत्यांनी हा प्रगल्भपणा दाखवायला हवा होता पण निष्ठा दाखवायचा अती मोह त्यांना आवरलेला दिसत नाही. संकटकाऴी बाष्कऴ पिचकार्या मारणे योग्य नाही. निरंजन डावखरे यांनी पुढच्या काऴात त्या खुषाल माराव्यात. रोज देवेंद्रांचे निरंजन ओवाऴून पोवाडे गावेत, पाय धुवून त्यांच्या पायाचे तिर्थ प्राशन करावे आणि कृतकृत्य व्हावे. जिभेला घट्टे पडेपर्यंत तऴवे चाटावेत याबाबत आमचे अजिबात दूमत नाही. तो त्यांचा अधिकार आणि हक्क आहे. सुपारी देवून किंवा त्यांना शक्य असेल तर त्यांनी स्वत: उध्दव ठाकरेंना शिव्या द्याव्यात पण या संकटसमयी असला बाष्कऴपणा बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांनीही अशा बाष्कऴ गँगला आवरावे. लष्कर ए देवेंद्राला चाप लावावा. स्वत:चे स्तोम स्वत: माजवले की विनाशाची प्रक्रीया लवकर सुरू होते. त्यांनी या स्तुतीपाठकांना लोकांना मदत करण्याचे आवाहन करावे. राजकीय अक्कल न लावता मन लावून लोकांच्या मदतीला उभे राहण्याचे आवाहन करावे. यातूनच फडणवीसांचेही नेतृत्व मोठे होईल आणि डावखरेंचेही. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसर्याची रेषा पुसायची नसते, तर त्याच्या बाजूलाच आपली रेषा मोठी काढायची असते. याचे भान फडणवीस आणि निरंजन डावखरे यांनी ठेवावे. फडणवीसांनी या  स्तुतीपाठकांना लगाम घालावा कारण राजकारण करण्याची ही वेऴ नाही.
Reactions

Post a Comment

0 Comments