Hot Posts

6/recent/ticker-posts

करोना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स

करोना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स

सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलेले असून आपल्या देशात सुद्धा चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकापाठोपाठ अनेक राज्य करोनाच्या विळख्यात सापडले असून योग्य ती दक्षता, खबरदारी घेणे, सरकार आणि आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक सूचना, नियमावलीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात करोना आजाराचा वेळीच पायबंद केला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
खरेतर जनरल प्रॅक्टिशनर्स‌‌‌ हे आपल्या देशातील आरोग्य सेवेचा कणा आहे. जनतेला आरोग्यसेवेची कवचकुंडले देण्यात आणि कोणताही आजार आटोक्यात आणण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर्सचे महत्त्वपुर्ण योगदान आहे. मात्र सध्याची बिकट परिस्थिती पाहता मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री आणि मा. आरोग्यमंत्र्यांनी जी पाऊले उचलली आहेत, आपण सर्वांनी त्याला साथ देणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र असे करतांना बरेचदा आपली ओपीडी सुरु ठेवायची की बंद ठेवायची याबाबत मतमतांतरे आहेत. तरीपण एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता काही मुद्दे मांडणे जरुरी आहे.
१) प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनर्स‌‌‌ कडे नियमितपणे येणाऱ्या रुग्णांची एक संख्या असते. जर आपण सर्वांनी ओपीडी बंद केली तर या सर्व रूग्णांचा अतिरिक्त भार शासकीय रुग्णालयांवर पडू शकतो.
२) दवाखान्यात येणारा प्रत्येक रूग्ण करोनाबाधीत असतोच असे नाही. यामुळेच इतर आजारांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची ओपीडी बंद ठेवल्याने गैरसोय होऊ शकते.
३) करोनाची लागण कोणालाही होऊ शकते, त्यामुळे मी डॉक्टर असल्याने मला काहीच होणार नाही या गोड गैरसमजुतीत कोणी राहू नये. रुग्ण तपासणी करतांना मास्क आणि इतरही सुरक्षा उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.
४) रुग्ण तपासणी करता येताच त्याला ओपीडीत हात सॅनिटाईझरने साफ करणे,तोंडाला मास्क, रुमाल बांधणे बंधनकारक करावे.
५) शक्यतोवर आपल्या कक्षात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी केवळ एकट्या रूग्णालाच आत प्रवेश द्यावा. (बालक आणि स्त्री रुग्णासोबत एक नातेवाईक सोबत असावे).
६) रुग्णाला कमीतकमी १ मीटर दुर बसवून कमीत कमी वेळेत आवश्यक ती तपासणी करावी. 
७) प्रत्येक रुग्ण तपासल्यानंतर हात सॅनिटाईझरने स्वच्छ करावे.
८) जनरल प्रॅक्टिशनर्स‌‌‌ हे रुग्णांचे आरोग्य पालक असतात. प्रत्येक रुग्णाला मग तो कोणत्याही आजारासाठी आला असला तरी करोना आजाराविषयी माहिती आणि मार्गदर्शन जरुर करावे. यामुळे समाजात करोनाविषयी जनजागृती केली जाऊ शकते. करोनाविषयी शंकाकुशंकांचे समाधान करावे.
९) संशयित रुग्णांना त्वरीत शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवावे.
१०) करोना ही राष्ट्रीय, वैश्विक आपत्ती आहे‌ आणि ही दूर करण्यासाठी यात जनरल प्रॅक्टिशनर्स‌‌‌चे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे. म्हणून जोपर्यंत शासकीय संस्था किंवा स्थानिक प्रशासन आदेश देत नाहीत तोपर्यंत आवश्यक ती खबरदारी (स्वत:ची आणि रुग्णांची) घेऊन जनरल प्रॅक्टिशनर्सनी रुग्णसेवा सुरू ठेवायला हरकत नसावी. मात्र याकरिता सरकारकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन आपण केले पाहिजे.
Reactions

Post a Comment

0 Comments