स्वयंशिस्त पाळत घरात थांबून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे - सरपंच नंदाबाई झाडबुके
घेरडी/प्रतिनिधी : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा होणारा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कठोर पावले उचलली असताना काही बेजबाबदार व मोकाटपणे फिरणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या स्वतःबरोबरच इतरांच्या जीविताशी खेळ सुरू केल्याने पोलीस आणि प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. अशा या मोकाटपणे वावरणार्या लोकांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
कोरोना या विषाणूजन्य रोगावर नियंत्रण मिळवून त्याला हद्दपार करण्यासाठी राज्य शासनाने संचार बंदीचे आदेश लागू केलेले असतानादेखील काही हौसे गवसे लोकांनी त्याला हरताळ फासल्याचे दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांतून चिंता व्यक्त होत आहे. विशेषता बाहेरगावावरून आलेले लोकांसाठी शासनाने त्यांची नोंदणी गावातील आरोग्य केंद्र ,पोलीस पाटील, तलाठी, ग्रामपंचायत यांचेकडे करून किमान चौदा ते पंधरा दिवस कोठेही न फिरता घरातच थांबण्याचे आदेश आहेत.
तरीदेखील काही लोक स्वतःच्या जिविता बरोबरच, बाहेर मोकाटपणे फिरून इतरांच्या जीवितास देखील धोका निर्माण करत आहेत. ज्यांच्यासाठी प्रशासनाचा हा अट्टहास सुरू आहे त्यांनाच याचे गांभीर्य नाही. याचा प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. प्रशासनाने दिलेले आदेश व सूचना या केवळ जनतेसाठीच असल्याने ,त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी असल्याने प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी म्हणून घरात थांबणे बंधनकारक आहे. असे न करता मोकाटपणे वावरणाऱ्या अशा लोकांना कठोर शासन देऊन अद्दल घडवणे गरजेचे आहे. अशा अति शहाण्या लोकांमुळेच इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये कोरानाने थैमान घातले आहे.
प्रत्येक गावातील ग्रामपंचायत प्रशासन, तलाठी, आरोग्य केंद्रे, पोलीस पाटील यांच्याकडून सातत्याने असे आवाहन करून देखील या मोकाट फिरणाऱ्या लोकांवरती कोणताही परिणाम होताना दिसत नाही. त्यातच बाहेरगावावरून आलेल्या लोकांनी आपण गावात आल्याची नोंदणी प्रशासनाकडे करून कोठेही न फिरता घरी थांबणे बंधनकारक आहे. परंतु हे लोक गावभर मोकाटपणे फिरत असल्याने त्यांच्यामुळे गावागावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना या विषाणूजन्य संसर्गावर मात करण्यासाठी तसेच स्वतःच्या आणि प्रियजनांच्या जीवितासाठी शासनाचे आदेश व सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विरुद्ध युद्ध जिंकण्यासाठी अहोरात्र आपल्यासाठी झटणाऱ्या प्रशासनास सहकार्य करावे. आपण सर्वांनी घरी थांबलो तरच कोरोना विषाणूंच्या प्रसार होण्याची, संसर्गाची साखळी तुटणार आहे . तसेच त्यासाठी शासनाकडून येणारे विविध प्रकारचे आदेश आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.आपण घरी थांबू या आणि प्रशासनास सहकार्य करू या.
0 Comments