पाण्याबाबत सांगोला तालुक्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही- चेतनसिंह केदार
सांगोला (तालुका प्रतिनिधी): मंत्रिमंडळाच्या बैठकीत निरेचे बारामतीला दिलेले पाणी हे सांगोला तालुक्यावर अन्यायकारक असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आंदोलन करून बारामतीचे पाणी बंद केल्याने सांगोला तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले. परंतु 19 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाने सांगोला तालुकावर दुष्काळाचे संकट निर्माण होणार आहे. तरी हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि पूर्वीप्रमाणे पाणी वाटप करण्यात यावे असे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयास देण्यात आले. बारामतीला पाणी देण्याचा निर्णय रद्द न झाल्यास यापुढील काळात सांगोला तालुक्यावर होणारा अन्याय सहन न करता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चेतनसिंह केदार यांनी दिला आहे. निरा देवघर धरणाचे काम सन -2007 मध्ये पुर्ण असुन 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे व गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा निर्मीत झाला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजीत लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही, ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर निरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याचे आदेश फडणवीस सरकारने दिले होते. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची भेट घेत निरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी रोखण्याची मागणी केली. गिरीश महाजनांनीही तातडीने बारामतीला जाणारं पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र 19 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उजव्या कालव्याचे पाणी डाव्या कालव्याला सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून पाण्यासाठी पुन्हा वणवण फिरण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात सांगोला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगोला तालुक्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी 19 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेला निर्णय रद्द करावा यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी तहसिल कार्यालयाला निवेदन दिले आहे. तातडीने या निवेदनाची दखल घेऊन सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी वरिष्ठ पातळीवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा निरेच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी दिला आहे. यावेळी युवक नेते अभिजित नलवडे, वासुदचे उपसरपंच विठ्ठल केदार, संजय केदार, दत्ता जाधव, विजय बाबर, बाळासाहेब गावडे, गणेश कदम, पप्पू पाटील, नंदकुमार शिंदे, दीपक केदार, राहुल केदार, जगदीश केदार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, चेतनसिंह केदार मित्रपरिवार उपस्थित होते.
0 Comments