Hot Posts

6/recent/ticker-posts

करमाळ्याचे दोन सरसेनापती व बार्शी, मंगळवेढा याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्कामी - डॉ. प्रकाश पवार

करमाळ्याचे दोन सरसेनापती व बार्शी, मंगळवेढा याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्कामी - डॉ. प्रकाश पवार

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य जनतेचे राजे होते. त्यांनी सर्व जातीधर्मातील माणसांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली दिसून येते. सार्वभौम राज्याची स्थापना करणारे भारतातील पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज होते, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश पवार यांनी केले. मराठा समाज सेवा मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. प्रकाश पवार यांनी गुंफले. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीदृष्टी व सामाजिक न्याय या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. त्यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व दिपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची दृष्टी ही छत्रपती शाहू महाराज व बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्यात दिसते. छत्रपतींच्या कल्याणकारी राजाचा दूरदृष्टीपणा महाराष्ट्राने समजून घेणे गरजेचे आहे. तो न समजल्यामुळे महाराष्ट्राची वाताहत झाली आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शाम रोक्षेकर व महादेव रोक्षेकर हे दोन सरसेनापती करमाळ्याने स्वराज्याला दिले. शिवाजी महाराज हे बार्शी तसेच मंगवेळढा येथे मुक्कामी आले असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून बौद्धिक विचारांची नागरीकांना मेजवानी मिळते असे म्हणत व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या. सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी देखील या व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. महेश माने यांनी करून दिला. सुत्रसंचलन सारिका महामुनी-पंडीत यांनी केले व आभार हणमंतु बेसुळके यांनी मानले. यावेळी विनायकराव पाटील, निवृत्ती केत, शहाजी सुर्वेगुरुजी, अ‍ॅड. दादासाहेब देशमुख, मोहन गोरे, नामदेव थोरात आदि मान्यवर उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments