जिल्ह्यातील शासकीय अधिकरी कर्मचारी शुक्रवारी कामाची ग्वाही देवून वचनबध्द होणार
पुणे दि.२७:-“पाच दिवसाचा आठवडा” ही जिव्हाळयाची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य करुन त्याची अंमलबजावणी दिनांक 29 फेब्रुवारी 2020 पासून होणार आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचा आनंद व्दिगुणीत झालेला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. या सुटीच्या मोबदल्यात कामाची वेळ वाढलेली आहे. याकरिता अधिकारी महासंघाच्या वतीने शासनास अधिक कामाची हमी दिलेली आहे. कामाची तत्परता, गतिमानता, पारदर्शकता, सकारात्मकता आणि सौजन्यता ही गुणात्मकता विचारात घेऊन जनतेमध्ये महाराष्ट्राचे प्रशासन लोकाभिमुख करण्याचे कर्तव्य व कार्यसंस्कृती अभिमान म्हणून अधिकारी व कर्मचारी कायम वचनबध्द राहणार आहेत. पाच दिवसांचा आठवडा या मागणीमुळे निर्माण झालेल्या नव्या उत्साहाचा व उर्जेचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासाची प्रतिमा उंचाविण्यासाठी करु या, असे आवाहन पुणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने पुणे जिल्हयातील सर्व अधिकारी बंधू भगिनींना करण्यात येत आहे. याकरिता दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी किंवा दुपारी आपआपल्या कार्यालयात एकत्रित येवून जनतेस कामाची ग्वाही देवून वचनबध्द होणार आहे असे राज्य उपाध्यक्ष हनुमंत धुमाळ, राज्य उपाध्यक्ष आनंद कटके, अध्यक्ष एन.पी.मित्रगोत्री, कार्याध्यक्षा डॉ. जयश्री कटारे, राज्यसरचिटणीस विनायक लहाडे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
0 Comments