Hot Posts

6/recent/ticker-posts

दुष्काळी जनतेची शेवटपर्यंत साथ सोडणार नाही--रणजितसिंह नाईक निंबाळकर

दुष्काळी जनतेची शेवटपर्यंत साथ सोडणार नाही--रणजितसिंह नाईक निंबाळकर.


सांगोला (तालुका प्रतिनिधी): निरेच्या हक्काच्या पाण्याची बारामतीकरांनी चोरी केली होती. परंतु मी खासदार झाल्यानंतर चोरून नेलेले पाणी माघारी आणले. त्यानंतर दुष्काळी सांगोला तालुक्याला चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली. मात्र बळीचे राज्य गेले आणि चोरांचे सरकार सत्तेवर आल्याने सांगोला तालुक्यावर पुन्हा अन्याय झाला. पाण्यासाठी दुष्काळी जनतेची शेवटपर्यंत साथ सोडणार नसून महाविकास आघाडी सरकारची झोप उडाल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी शरद पवारांना अंगावर घेतले असून तीन चाकाच्या आघाडी सरकारचा टेम्पो पलटी करणारच असे आव्हान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिले.
        नीरा देवधर धरणातून मिळणाऱ्या पाण्याबाबत सांगोला तालुक्यावर झालेला अन्याय, आघाडी सरकारने केलेली शेतकऱ्याची फसवणूक आणि राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून या घटनांना आळा बसवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सांगोला यांच्या वतीने मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
      यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, युवक नेते अभिजित नलवडे, नगरसेवक आनंद माने,  पाणी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते दत्ता टापरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऍड.गजानन भाकरे, प्रणव परिचारक, संभाजी आलदर, राजश्रीताई नागणे, विजय बाबर, साहेबराव पाटील, नवनाथ पवार, युवक नेते प्रताप घाडगे, विठ्ठल केदार, दत्तात्रय जाधव, गणेश कदम, शिवाजी गायकवाड, राहुल गायकवाड, पप्पू पाटील, एन.वाय.भोसले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, आघाडी प्रमुख, शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, गेली 25 वर्ष सत्ता असताना आमच्या हक्काचे पाणी पळवले आहे. शरद पवार यांची दहशत असल्याने मला संपविण्याचा विडा उचलला. आता रणजितसिंह निंबाळकर यांना कसे संपवायचे याचा विचार सरकार करत आहे. जनतेच्या आशीर्वाद पाठीशी असेल तर हम खडे तो सरकार से बडे,  हम दिखाएंगे असे म्हणत त्यांनी आव्हान दिले. सरकारच्या कानात शिरण्याची वेळ आली असून
तीन चाकांचे लबाडांचे सरकार 
उलथून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जनतेचा कौल नसतानाही लाचार सरकार सत्तेत आले आहे. फडणवीस सरकारने घेतलेले थेट सरपंच निवड, जलयुक्त शिवार, जनतेतून नगराध्यक्ष निवड, मार्केट कमिटीत शेतकऱ्यांचा मतदानाचा हक्क असे महत्वपूर्ण निर्णय रद्द केले आहेत. अवकाळीची नुकसानभरपाई दिली नाही. दुष्काळ असताना हीच मंडळी फोटो काढत होती, तीच मंडळी आता सत्तेवर आली आहेत त्यामुळे पाण्याची चोरी होणार आहे. पण, मी ही कच्या गुरूचा चेला नाही. केंद्रात आमचं सरकार आहे आणि राज्यातही येणार आहे काळजी करू नका. तुम्ही आमचं पाणी पळवले आहे प्रसंगी कॅनॉल काय धरण फोडायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. दुष्काळी जनतेची शेवटपर्यंत साथ सोडायचं नाही असा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तीन चाकाच्या सरकारचा टेम्पो पलटी करणारच असे थेट आव्हान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी शरद पवारांना दिले.


        यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यापूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. आताच्या ठाकरे सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, परंतु त्यांना विसर पडला आहे. भाजपच्या काळात सुरू केलेल्या अनेक योजना आताच्या सरकारने जाणीवपूर्वक बंद केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा सांगोला तालुक्यासाठी हक्काच्या पाण्याची तरतूद केली होती. परंतु आता निरा देवधरच्या पाणी वाटपात सांगोला तालुक्यावर अन्याय केला जात आहे. खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी वाट्टेल ते आंदोलन करण्याची तयारी केली आहे. चूल बंद करू पण पाण्यासाठी रस्त्यावर उतरू असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी व्यक्त केला.
         यावेळी श्रीकांतदादा देशमुख म्हणाले, निरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे. शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला आहे. अनेक चांगल्या योजना गुंडाळण्याचा सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांना उपाशी मारण्याचे धोरण बारामतीकरांनी अवलंबले आहे. तालुक्याच्या पाण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
       यावेळी जेष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, विजय बाबर, संभाजी आलदर, ऍड.गजानन भाकरे, राजश्रीताई नागणे, एन.वाय.भोसले यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार -सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तहसीलदार योगेश खरमाटे यांना निवेदन देण्यात आले.
Reactions

Post a Comment

0 Comments