अप्पर तहसिलदार कार्यालयाचे मंद्रूप येथे उद्घाटन
सोलापूर दि.20 :- मंद्रूप येथे अप्पर तहसिलदार कार्यालयाचे उद्घाटन खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आ. सुभाष देशमुख, मंद्रुपच्या सरपंच कलावती खंदारे, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, पंचायत समिती सभापती सोनाली करपे, पंचायत समिती सदस्य दुपारगुडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी ( महसूल) गजानन गुरव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, अनिल कारंडे व तहसिलदार श्रीकांत पाटील, उज्वला सोरटे, अंजली मरोड आदी उपस्थित होते. खा. जयसिध्देश्वर महास्वामी म्हणाले, “ 9 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अप्पर तहसिलदार कार्यालयास मान्यता प्राप्त झाली त्यानंतर अत्यंत जलदगतीने अप्पर तहसिलदार कार्यालयाचे बांधकाम करुन ते जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. तहसिलदार कार्यालय स्थापन झाल्यामुळे परिसरातील 37 गावे व 3 मंडलाचे कामकाज या कार्यालयातून होणार आहे. तहसिलदार कार्यालयाची स्थापना झाल्याने परिसरातील लोकांना आता सोलापूरला न जाता जनतेचे प्रश्न आता या कार्यालयातून सुटणार आहेत.” आ. सुभाष देशमुख म्हणाले, ‘ परिसरातील 37 गावांचे खुप प्रश्न आहेत. पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, शेतातील पाणंद रस्ते आदीबाबच्या सोयी सुविधांचे प्रश्न आता याठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न करावा तसेच जनतेच्या अडीअडचणींची अधिका-यांनी दखल घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.’ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दक्षिण सोलापूरची परिस्थिती पहाता हा भाग दुर्लक्षित असल्याने याठिकाणच्या लोकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मंद्रूप येथे तहसिलदार कार्यालयास मान्यता मिळाली व अल्पावधीतच कार्यालयाची उभारणी करण्यात आली. आज ख-या अर्थाने येथील 37 गावे व 3 मंडलांतील लोकांना न्याय मिळाला आहे, लोकांची प्रशासकीय अडचण दूर होऊन आता त्यांच्या महसूल विभागाकडील अपेक्षा पूर्ण होतील व त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सुटले जातील, असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने करण्यात आली तर आभार प्रदर्शन तहसिलदार उज्वला सोरटे यांनी केले. यावेळी महसूल प्रशासनातील अधिकारी - कर्मचारी व मंद्रूप येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments