पाण्याबाबत तालुक्यावरील अन्याय सहन करून घेतला जाणार नाही - दिपकआबा साळुंखे पाटील
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली निरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आग्रही मागणी
सांगोला प्रतिनिधी :
पाण्याच्या योजनेच्या टेलला असलेल्या सांगोला तालुक्यावर कायमच अन्याय झाला आहे. सांगोल्याच्या वाट्याचे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे अशी सांगोला व पंढरपूर तालुक्यातून अनेक वर्षांपासून मागणी आहे. याबाबत आज अखेर केवळ पोकळ आश्वासन मिळाले आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत न पाहता आमच्या हक्काचे व आमच्या वाट्याला येणारे पाणी सोडा अशी आग्रहाची मागणी लावून धरत पाण्याबाबत तालुक्यावरील अन्याय यापुढील काळात सहन करून घेतला जाणार नाही. अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष व आम. दिपकआबा साळुंखे पाटील व आम. भारतनाना भालके यांनी केली.
पुणे येथे नीरा उजवा योजनेच्या कालवा सल्लागार समितीची बैठक राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी पार पडली. यावेळी तालुक्याचा पोटतिडकीने पाणी प्रश्न मांडून तालुक्यावर यापुढील काळात पाण्यासंदर्भात अन्याय होणार नाही याकरिता आम. दिपकआबा साळुंखे-पाटील व पंढरपूरचे आम. भारतनाना भालके यांनी आग्रही मागणी लावुन धरली.
या बैठकीसाठी निरा उजवा कालवा मुख्य अभियंता तसेच शाखा अभियंते उपस्थित होते.
यापूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक न घेता पाण्याचे नियोजन केले जात होते त्यामुळे तालुक्यावर अन्याय झाला आहे. म्हणून यापुढील काळात नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला मिळणारे पाणी सोडण्यापूर्वी व त्याचे नियोजन करण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊनच पाण्याचे नियोजन करावे, पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने शाखा अभियंता व पाटकरी यांची पदे वेळेत भरण्यासंदर्भात मागणी करत सांगोला तालुक्यातील 3 सीडी वर्क बांधून देण्याची मागणी मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केली. तर पंढरपूर तालुक्यातील अनवली टाकळी कासेगाव या भागात 400d वर्क बांधून देण्याची मागणी पंढरपूरचे आमदार भारतनाना भालके यांनी केली. त्याचबरोबर मैल 93 च्या खाली पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे तसेच पाण्याचे पाळी समान पाणीवाटप करून नियोजित हक्काचे पाणी देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावा अशीही मागणी सांगोला व पंढरपूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देईल निरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी सदर मागणीवर तातडीने पूर्तता करून लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच या पुढील काळात प्रत्येक तालुक्याच्या वाट्याला मिळणाऱ्या हक्काचे पाणी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर या बैठकीत आलेल्या मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने प्रयत्न केला जाईल असेही आश्वासन राष्ट्रवादीचे नेते आम. अजित पवार यांनी दिले.


0 Comments