Hot Posts

6/recent/ticker-posts

जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार जाहीर

जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार जाहीर






बार्शी प्रतिनिधी -


येथील ख्यातनाम श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर स्व. डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी बहुजनांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृहाच्या माध्यमातून खेडोपाडी विद्यालये व महाविद्यालये काढली. समाजातील अंधश्रध्दारुपी तण काढण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारुन त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले त्यांचे सन १९८१ मध्ये महानिर्वाण झाल्यावर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संस्थेच्या वतीने सन २००७ पासून 'कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार' दरवर्षी एका समाज कार्यकर्त्याला दिला जातो. आतापर्यंत स्वातंत्र्यसेनानी नागनाथ (आण्णा) नाईकवाडी, मा. जी.डी. (बापू) लाड, मा. गेल ऑम्वेट, मा. गणपतराव देशमुख, डॉ. सुनिलकुमार लवटे, प्रा.डॉ. आ.ह. साळुखे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रा. डॉ. अनिरुध्द जाधव मा. डॉ. नरेंद्र दाभोळकर (मरणोत्तर) व मा. डॉ. रमणलाल दोशी या मान्यवरांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या ११७ व्या जयंती निमित्ताने सन २०१९ चा सदर पुरस्कार थोर विचारवंत पन्नालाल सुराणा यांना देण्याचे पुरस्कार निवड समितीने एकमताने जाहीर केले आहे. सदर कार्यक्रम संस्थेच्या संत तुकाराम सभागृहात शुक्रवार
दिनांक ०३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रक्कम रुपये २५०००/- रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. पन्नालालजी सुराणा हे विद्यार्थी दशेपासून राष्ट्र सेवादल सैनिक आहेत. सन १९८६ ते १९९५ या कालावधीत ते या संघटनेचे अध्यक्ष होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष, समाजवादी जन परिषद या राजकीय पक्षांचे राजकीय कार्यकर्ते आहेत. शेतकरी, शेतमजूर, एस. टी. कामगार,हमाल आघाडी आदींच्या चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. भूदान आंदोलनात काही काळ जमीन वाटपाचे काम त्यांनी केली. गेली १० वर्षे ते पाणलोट क्षेत्र विकास योजनांर्तगत पडजमीन विकास व वृक्षपट्टा योजना राबवित आहेत. दुधी (ता. परंडा) येथे वनौषधी संगोपनाचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. भूकंपग्रस्त मुलामुलींसाठी 'आपलं घर' हा रचनात्मक प्रकल्प ते राबवित आहेत. ते स्वत: गेल्या १० वर्षापासून आसू
(ता.परंडा) या खेड्यात वास्तव्यात असून देशभर समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत ते उत्तम लेखक असून त्यांनी ३० पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांचे 'ग्यानबाचे अर्थकारण' हे पुस्तक आजही दिशादर्शक आहे. ते उत्तम वक्ते असून मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये वयांच्या ८६ व्या वर्षीही ते भारतभर व्याख्याने देऊन सतत भ्रमंती करीत आहेत.
त्यांना शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता बार्शीच्या संत तुकाराम सभागृह,बार्शी येथे पूण्याचे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे गाढे अभ्यासक
प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या समाज प्रबोधनपर कार्यक्रमास सर्वांनी यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस जनरल सेक्रेटरी व्ही.एस.पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे चेअरमन जयकुमार शितोळे, सदस्य दिलीप रेवडकर,डॉ. चंद्रकांत मोरे आदीं उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments