निलकंठ शिंदे यांचे गरजूंसाठी 51 वेळा रक्तदान
सांगोला/प्रतिनिधी ः
रक्तदानातून प्रेरणा घेवून निलकंठ शिंदे यांनी आजवर गेल्या 16 वर्षात 51 वेळा रक्तदान करून युवकांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. त्यांनी स्वतः संस्था उभारून गेल्या 11 वर्षापासून रक्तदान शिबीर भरविली आहे. ब्लड ऑन कॉल सारखी सुविधा गरजू रुग्णांसाठी उभारण्यात आली आहे. या संकल्पनेतून मोफत रक्तदान करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून रुग्णांच्या गावाजवळ मोफत रक्तदान सेवा शिंदे सर देत आहेत. सुरूवातीस 2003 च्या दरम्यान सांगोल्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये त्यांनी रक्तदान केले. तेव्हा पासून रक्तदानाबद्दल समाजातील बरेच समज गैरसमज ते ऐकत होते. परंतू त्यांना रक्तदानामुळे ताजे तवाने वाटत असल्याचा अनुभव घेतला. आपल्यामुळे कोणाचातरी जीव वाचतो याविचारातून ही प्रेरणा शिंदे सरांना मिळाली. त्यातून स्वतः रक्तदान करत जागृतिही केली. अनेक रक्तदात्यांचे रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर केले. 2008 पासून मित्रांच्या सहकार्याने संस्था स्थापन करून त्यातून रक्तदान शिबीरे भरवली. आजवर 2900 बाटल्या रक्त संकलन करुन ते गरजूंना दिले त्यामुळे ही चळवळ शहर व ग्रामीण भागात सुरू करण्यात त्यांचा खारीचा वाटा असल्याचे शिंदे सर यांनी सांगितले. गेल्या 16 वर्षात त्यांनी दरवर्षी 2 ते वेळा जशी संधी मिळेल त्याप्रमाणे रक्तदान करून आज अशोक कामटे संघटनेने आयोजित केलेल्या शहीद दिना निमित्त 51 रक्तदान करुन एक नवीन आदर्श शहरात युवकांसमोर ठेवला आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापासून मित्रांच्या सहकार्यान ब्लड ऑन कॉल ही संकलपना यशस्वी राबवून त्यातूनही त्यांनी रुग्णांना स्वखर्चाने रुग्णालयात जावून मोफत रक्तदान केले. ब्लड ऑन कॉल साठी गेल्या 6 वर्षात त्यांनी स्वतः 9 वेळा रुग्णांच्या गरजेच्या ठिकाणी जावून रक्तदान केले.
चौकट -
सकारात्मक उर्जा मिळते
वरचेवर रक्तदान केल्याने कधीही थकवा त्रास जाणवला नाही. त्यातून सकारात्मक उर्जा मिळाली. मी दररोज पहाटे पाच वाजता नियमीत उठतो. आजवर मला कोणताही आजार झाला नाही. पुढील काळात निरपेक्ष भावनेने शक्य असेल तेव्हा कोणतेही उदिष्ट न ठेवता जो पर्यंत रक्तदान करता येईल तो पर्यंत रक्तदान करणार आहे. निलकंठ शिंदे सर(संस्थापक शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना).
0 Comments