आ. प्रणिती शिंदेंसह दोघांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी
आरोग्य सेवा स्वस्त करा, या मागणीसाठी पालकमंत्र्यांना घेराव घातल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे व नगरसेवक चेतन नरोटे या दोघांच्या अटकपूर्व जामिनावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.के. अनभुले यांच्या कोर्टात 11 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
आरोग्य सेवा स्वस्त करा, या मागणीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर घेराव घालण्यात आला होता. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आ. प्रणिती शिंदेंसह इतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आ. प्रणिती शिंदे या तारखेला सतत गैरहजर राहिल्याने कोर्टाने आ. प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध जामीनपात्र वारंट जारी केले होते. त्यानंतर आ. प्रणिती शिंदे या 4 सप्टेंबर रोजी स्वतःहून कोर्टात हजर झाल्या होत्या. त्यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आ. प्रणिती शिंदे व नगरसेवक चेतन नरोटे या दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. 9 सप्टेंबर रोजी आ. प्रणिती शिंदे या पुन्हा कोर्टात हजर झाल्या होत्या. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.के. अनभुले यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आ. प्रणिती शिंदे व नगरसेवक चेतन नरोटे यांच्या अटकपूर्व जामिनावर 11 तारीख नेमण्यात आली आहे. कोर्टाने तोपर्यंत अंतरिम जामीन वाढविला आहे.
या खटल्यात आरोपींच्यावतीने अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी यांनी, तर सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले..
0 Comments