वाइन शॉपमधील तळीरामांवर आता सरकारी ‘वॉच’, सी.सी.टी.व्ही. लावणे बंधनकारक....
निवडणूक काळात वाहणारे दारूचे पाट रोखण्यासाठी आता सरकारने कंबर कसली आहे. देशी दारूच्या दुकानांबरोबरच वाइन शॉप, परमिट रूममधील दारूची विक्री मोठय़ा प्रमाणात वाढते. परवाना नसतानाही अनेक जण दारूच्या बाटल्या बाळगतात. याला चाप लावण्याबरोबरच त्यावर नजर ठेवण्यासाठी सरकारने आता प्रत्येक दारूचे दुकान, वाइन शॉपमध्ये सी.सी.टी.व्ही. लावणे बंधनकारक केले आहे. तसेच त्याचे रेकॉर्डिंग एक महिन्यापर्यंत ठेवावे लागणार आहे. तसे न केल्यास संबंधित दुकानाला 50 हजार रुपयांचा दंड आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.एखाद्या विभागात देशी दारू विक्रीचा परवाना किंवा वाइन शॉपचा परवाना देताना उत्पादन शुल्क विभाग तेथील दारू विक्रीच्या सरासरीचा अभ्यास करून परवाना देते. त्याच प्रमाणात त्या दुकानांमधून दारूची विक्री होणे अपेक्षित असते. पण निवडणूक काळात हे सरासरीचे प्रमाण सर्रासपणे मोडीत निघत असून एक-दोन बाटल्यांऐवजी थेट दारूच्या बॉक्सचीच विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर अंकुश ठेवण्याबरोबरच मोठय़ा प्रमाणात दारूची खरेदी कोणाकडून व कशासाठी केली जात आहे यावर वॉच ठेवण्यासाठी आता प्रत्येक दारूच्या दुकानात सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवणे बंधनकारक केले असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
0 Comments