*दीड लाखांचं मंगळसूत्र बैलाने गिळलं, आठ दिवस शेणात शोधत राहिला मालक*
आपली मौल्यवान वस्तू जर चोरीला गेली किंवा हरवली तर किती त्रास होता ना? पण घरातल्या बैलानेच तुमची मौल्यवान वस्तू चुकून गिळली तर? असाच प्रकार नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे. त्याच्या बैलाने दीड लाखाचं मंगळसूत्र गिळलं आणि ते परत मिळवताना त्याची तारांबळ उडाली.
काही दिवसांपूर्वी बैल पोळा हा सण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात साजरा करण्यात आला.
आपल्या घरच्या बैलांनी पूजा करून त्यांना गोडधोड खायला घालण्यात आलं. पण नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा जीव मात्र या घटनेनंतर टांगणीला लागला. त्याचं झालं असं की, घरच्या बैलासाठीच्या नैवेद्याच्या थाळीत शेतकऱ्याच्या पत्नीने तिचं दीड लाखांचं मंगळसूत्र ठेवलं होतं. बैलाला खाऊ घालण्याची मिठाईही त्याच थाळीत होती. बैलाला मिठाई खाऊ घालण्यासाठी तिने ती थाळी त्याच्यासमोर ठेवली. तितक्यात त्यांच्याकडे वीज गेली आणि काळोख झाला.
काळोखात दिसावं म्हणून ती मेणबत्ती आणायला आतल्या खोलीत गेली. तेवढ्या वेळात बैलाने मिठाई गट्टम केली आणि सोबत मंगळसूत्रही. शेतकऱ्याने त्याच्या तोंडात हात घालून ते काढायचा प्रयत्न केला मात्र ते सापडलं नाही. त्यानंतर शेतकरी सलग आठ दिवस बैलाच्या शेणात मंगळसूत्र शोधत राहिला. तरीही त्याला ते सापडलं नाही. शेवटी त्याने बैलाला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेलं आणि तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करून मंगळसूत्र काढलं गेलं.
0 Comments