Hot Posts

6/recent/ticker-posts

खते, बियाणे यांचा पुरवठा वेळेत करा ः पालकमंत्री

सोलापूर (प्रतिनिधी)ः आगामी खरीप हंगामात शेतकर्‍यांना खते, बियाणे आणि  वीज यांचा पुरवठा वेळेत होईल याबाबत दक्षता घेतली जावी, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज दिल्या.पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीस सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, विभागीय कृषी संचालक विजय इंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार उपस्थित होते.  
बिराजदार यांनी प्रारंभी कृषी विभागाने खरीप हंगामासाठी केलेले नियोजन आणि विविध योजनांतून शेतकर्‍यांना देण्यात आलेले लाभ, अनुदान आणि फलनिष्पत्ती याबाबतचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी आपात्कालीन पीक नियोजन, जलयुक्त शिवार अभियान, गट शेती योजना याबाबतची माहिती दिली.पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले की, ‘खरीप हंगामात शेतकर्‍यांना खते आणि बियाणे वेळेवर मिळावीत या अनुषंगाने नियोजन करा. ईपॉस मशीनव्दारे खत विक्री केली जाणार आहे. त्यासाठी पुरेशी मशीन आहेत याबाबत खात्री करा. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार महाबीज आणि इतर संस्थांकडून बियाणे वेळेवर उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी’.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पतपुरवठा आराखड्यातील नियोजनानुसार राष्ट्रीय, सहकारी आणि ग्रामीण बँकांनी शेतीस पुतपुरवठा करावा. ग्रामीण विभागीय बँकांकडून गेल्या दोन वर्षात समाधानकारक पतपुरवठा झालेला नाही. यासाठी त्यांचे उद्दीष्ट्य कमी केले जावे. सोलापूर जिल्हा बँकेने शेतीसाठीच्या पतपुरवठ्याचे उद्दीष्ट्य पूर्ण करावे, असे सांगितले.
आमदार बबनदादा शिंदे यांनी शेतकर्‍यांना अद्याप दुष्काळी निधीचे वाटप झाले नसल्याचे सांगितले. यावर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र  शिंदे यांनी यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी आला आहे. त्यापैकी ४१ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले असून उर्वरित निधीचेही एप्रिल अखेरपर्यंत वाटप करण्यात येईल असे सांगितले.
बैठकीस जलसंपदाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रदीप झिले, प्रकल्प संचालक रवींद्र माने, सोलापूर जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, त्याचबरोबर विमा कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments