
६ एप्रिलला वांद्रे येथे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विराट शक्तीप्रदर्शन सभेचा उद्देश नकी काय होता? अमित शहा यांच्या भाषणाची भाषा, या सभेच्या निमित्ताने सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना झालेला त्रास, सभेच्या आदल्या दिवशी सांताक्रूझ विमानतळावर काढलेल्या रॅलीमुळे अनेकांची चुकलेली विमाने यांच्यामुळे हा प्रश्न अनेकांच्या मनात खदखदणे स्वाभाविक आहे. एकतर या सभेत प्रमुख वक्त्यांनी विरोधकांसाठी वापरलेली भाषा ही ज्या पक्षाचे नेतृत्व हे एकेकाळी श्यामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय व ज्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीचे विरोधकही चाहते होते, अशा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पक्षातील पुढची पिढी वापरते, हा मोठाच विरोधाभास आहे. नाशिकहून मुंबईत चालत आलेल्या मोर्चातील गरीब शेतकर्यांनी मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, म्हणून मध्यरात्री ४० किलोमीटरचा पल्ला चालत पार पाडला. इथे मात्र एसी बसेसपासून ते एसयुव्ही व विशेष रेल्वे गाड्यांनी आणलेल्या माणसांमुळे मुंबईच्या दररोजच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होईल याची तमाच बाळगली गेलेली दिसली नाही. उत्तर प्रदेशातील पोट निवडणुकीत सपा-बसपा एकत्र आल्यावर जो चमत्कार घडला, त्यातून विरोधक एकत्र येण्याची दिशा स्पष्ट झाली आहे. विरोधकांच्या होऊ घातलेल्या एकजुटीचा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने भलताच धसका घेतल्याचे दिसते. त्यामुळेच की काय पंतप्रधान नरेंद्र मोदींही विरोधक एकत्र येऊन हिंसाचार करणार असल्याचे म्हणतात. या भूमिकेला पूरकच अमित शहांच्या झालेल्या भाषणाचा रोख होता. लोकशाहीत आपल्या राजकीय विरोधकाचे शरसंधान करण्यात चूक काहीच नाही. मात्र यात शरसंधानाचा जसाच्या तसा अर्थ काढल्यास ते संसदीय लोकशाहीची समजच तोकडी असल्याचे द्योतक समजावे. अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महापुराची उपमा दिली. आता आपल्याच नेत्याला खरेतर अशा प्रकारच्या आपत्तीची उपमा त्यांनी का दिली असावी, हे त्यांचे त्यांनाच माहीत. या महापुरापासून वाचण्यासाठी म्हणे वटवृक्षावर साप, मुंगुस, कुत्रा, मांजर असे एकमेकांशी वैर असणारे प्राणी चढून बसतात तसे विरोधकांचे झाले आहे. आता हा वटवृक्ष म्हणजे कॉंग्रेस आहे का, याचे उत्तरही त्यांनी देऊन टाकावे. वांद्रे येथील बीकेसी मैदान हे पूर्व व पश्चिम उपनगरांच्या सीमेवर आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूंनी येणार्या वाहतुकीवर याचा किती परिणाम होईल, याचा अंदाज घेऊन प्रशासन कामाला लावणे गरजेचे होते. अनेकजण सभेनंतर उपनगरी गाड्यांच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात, तर काहीजण वातानुकुलित लोकलमध्ये चढल्याने प्रवासी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार बाचाबाचीच्या क्लिपा आता समाजमाध्यमांवर फिरत आहेत. सत्ता हे साध्य नसून ते सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठीचे साधन असल्याचे अमित शहा म्हणाले, एवढ्या एकाच गोष्टीचा गांभीर्याने त्यांच्या पक्षातील नेत्यांनी विचार केला, तरी खूप मोठा चांगला बदल घडू शकतो.
0 Comments