Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा वेलफेअर व शासन आणि लोकसहभागातून ‘विठ्ठल गंगा’ बेंद ओढ्याचे पुनरुज्जीवन ः धनराज शिंदे

माढा (प्रतिनिधी)ः माढा वेलफेअर फाऊंडेशन, शासन व सीएसआर फंड तसेच लोकसहभागातून विठ्ठल गंगा बेंद ओढ्याच्या खोलीकरणाची म्हणजेच पुनरुज्जीवनाची योजना आखली असून १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९.३० वाजता ढवळस ता.माढा येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्या उपस्थितीत या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती माढा वेलफेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी पञकार परिषदेत दिली आहे. मागील १० महिन्यापासून हे काम व त्याचे सर्वेक्षण व नियोजन आम्ही सुरू केलेले आहे. माढा तालुक्यातील सर्वात मोठा व ३४ किमी. लांबीचा बेंद ओढा ढवळस , पिंपळखुंटे, चौभे पिंपरी, कुर्डू, कुर्डूवाडी, भोसरे, वेताळवाडी,वडाचीवाडी, रणदिवेवाडी, वडशिंगे, तडवळे, महातपूर ते सीना नदी उंदरगावपर्यंतचा बेंद ओढा हे काम टप्प्याटप्पाने २ ते ३ मीटर  खोलीकरण केले जाणार असून यामुळे या

भागातील ६० ते ६२ हजार एकर जमीन लागवडीखाली येण्यास मदत होणार आहे. हा काढलेला गाळ शेतक-यांनी स्वतःच्या वाहनाने शेतात टाकावा असेही आवाहन केले आहे. या ओढ्यावर छोटे मोठे ६० पेक्षा अधिक बंधारे आहेत. त्यामध्ये हे काम पूर्ण झाल्यावर २०० कोटी लिटर पाण्याची बचत होणार आहे. शासकीय निविदेनुसार ९ कोटी ३७ लाख रुपये खर्च होवू शकतो पण आम्ही हे काम फक्त ३ कोटी रूपयांमध्ये २ वर्षाच्या कालावधीत पूर्ण करणार आहोत त्यामुळे शासनाच्या ७० टक्के पैशाची बचत होईल. या योजनेमुळे १३ गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना नक्कीच सुटणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कासाळगंगा ओढ्याच्या पुनरुज्जीवनानंतर हे दुसरे सर्वात मोठे काम असून महाराष्ट्रात एक आदर्श पॅटर्न ठरावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या कामी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.
या महत्वाकांक्षी नाविण्यपूर्ण योजनील प्रकल्पासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या नियोजन मंडळाच्या निधीतून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच नाम फाऊंडेशन, प्रिसीजन फाऊंडेशन व विविध कंपन्यांचे सहकार्य मिळाले आहे. या बेंद ओढ्यावर शिरपूर पॅटर्नचे बंधारे पाणी अडविण्यासाठी उभारले जाणार आहेत.त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढून भूजलपातळी वाढण्यास नक्कीच मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या दुष्काळी परिस्थिती असलेल्या १३ गावातील लोकांना वेळोवेळी  पाण्यासाठी भटकंती व पायपीट करावी लागते म्हणून पाण्याचा दुष्काळच निर्माण होवू नये म्हणून गावोगावच्या लोकांनी पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम राबविला पाहिजे. या १३ पैकी १० गावांनी जलयुक्त शिवार अभियानात सहभाग घेतलेला आहे. हा उपक्रम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भविष्यात या बेंद ओढ्यातून पावसाळ्यात जादा झालेले पाणी सोडले जाणार असून सीना माढा उपसासिंचन योजनेची तिसरी वितरिका म्हणून दर्जा मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही माढा वेलफेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज शिंदे यांनी सांगितले आहे. या पञकार परिषदेसाठी युवराज शिंदे, दिलिप बिचतकर, महेश डोक, आनंद पानबुडे, यशवंत भोसले, विलास देशमुख, सुजित शिंदे, केशव आवटे, बाळराजे माळी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments