Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा पोलिस स्टेशनला आय एस ओ मानांकन प्राप्त ः सपोनि अतुल भोस

माढा (प्रतिनिधी)ः माढा पोलिस स्टेशनच्या प्रशासकीय आणि सामाजिक कार्याचा चढता आलेख म्हणजे गणेश उत्सवातील शिल्लक लोकवर्गणीतून ऍम्बुलन्स व १६ सी. सी. टीव्ही कॅमे-यांचे लोकवर्गणीतून केलेल्या लोकार्पणानंतर दिनांक ३ एप्रिल २०१८ रोजी माढा पोलिस स्टेशनला आय एस ओ मानांकन प्राप्त झाल्याची माहिती माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.
या कामी सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले आहे. ३१ मार्च रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी माढा पोलिस स्टेशनला भेट देऊन कामकाजाची पाहणी व तपासणी केली होती. त्यांनी माढा पोलिस स्टेशनच्या प्रशासकीय कामकाजाचे व इमारत आणि परिसर स्वच्छतेचे कौतुक केले होते. माढा शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच लोकांशी चांगला सामाजिक सलोखा राखल्यानेच त्यांच्या  तपासणीनंतर लगेच तिस-या दिवशी माढा पोलिस स्टेशनला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले असून हे माढा तालुक्यातील पहिलेच आय एस ओ मानांकन प्राप्त पोलिस स्टेशन बनले असल्याचेही सपोनि अतुल भोस यांनी सांगितले आहे.
माढा पोलिस स्टेशनमध्ये सध्या ४५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचा-याच्या सहकार्याने आम्ही सन २०१५ पर्यंत ३५० च्या आसपास अवैध वाहतूक आणि धंदे व इतर कारवाया होत होत्या ते प्रमाण सन २०१६ मध्ये ७०० झाले आणि सन २०१७ पासून आजतागायत ते प्रमाण ८६५ पर्यंत पोहोचलेले आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या ११ चो-यापैकी ९ चो-यांचा तपास करण्यात यश मिळविले आहे. सन २०१७ मध्ये दाखल ९ चो-यापैकी ४ चा तपास लावला आहे. सन २०१८ मध्ये ३ घरफोड्या दाखल असून त्यापैकी एका घरफोडीचा तपास लागला असून संबंधित लोकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात यश आले असून इतर चो-या व घटनांचा तपास करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  माढा शहरातील चो-या, वाहतुकीची कोंडी, अपघात, गुन्हेगारी, अवैध वाहतूक व धंदे, शालेय विद्यार्थ्यी व महिला यांना होणारा त्रास या घटना रोखण्यासाठी लोकवर्गणीतून माढा शहरातील मुख्य चौकात व रस्त्याच्या कडेला १६ सी. सी.टीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. भविष्यात कॅमे-यांची संख्या वाढविण्यासाठीही प्रयत्न असल्याचे सांगितले. मागील दोन वर्षांपासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करीत आहोत तसेच माढा शहर व परिसरातील शाळांमध्ये मुलींसाठी तक्रार पेटी बसविण्याचा उपक्रम राबविला आहे.
पोलिस अधिकारी आपल्या गावी हा उपक्रम माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ३८ गावामध्ये प्रभावीपणे राबवून आम्ही लोकांचा विश्वास संपादन केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
 या सर्व प्रशासकीय आणि सामाजिक कार्याची दखल घेत माढा पोलिस स्टेशनला आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments