सध्या राज्यातले वातावरण अतिशय रोगट, विकृत आणि विखारी झाल्याचे जाणवते आहे. जाती-पातीच्या भावना अतिशय टोकदार अन तिव्र झाल्याचे दिसते आहे. प्रत्येक जात आपल्या जातीचा झेंडा घेवून रस्त्यावर उतरताना दिसते आहे. हे चित्र फार भंयकर व भितीदायक आहे. समाज जाती-पातीत विभागला जावा, समाज आप-आपसात लढला जावा अशी व्युहरचना केली जात आहे. नेहमी युध्द लढण्यापुर्वी युध्दाची रणनिती ठरवली जाते. शत्रूच्या उणिवांची आणि ताकदीची जाणीव ठेवून व्युहरचना केली जाते. सध्या महाराष्ट्रात तेच सुरू आहे. २०१९ साली लोकसभेच्या व पाठोपाठ विधानसभेच्या निवडणूका येवू घातल्या आहेत. त्या निवडणूकांच्या धर्तीवर जोरदार मशागत चालू आहे. जाती-पातीत वाद पेटवून, दंगली घडवून सत्ता संरक्षण चालू आहे. येणार्या काळात महाराष्ट्रात दंगली घडवल्या जावू शकतात. कारण विकासाचे मुद्दे बकवास निघाले आहेत. सत्ताधार्यांचा दिखावू गोंडस चेहरा किती अक्राळ-विक्राळ आहे ते लोकांच्या लक्षात आले आहे.
६० वर्षात लोक जेवढे कॉंग्रेसला वैतागले नव्हते तेवढे तीन वर्षात या सत्ताधार्याना वैतागले आहेत. येणार्या निवडणूकीत पुन्हा सत्ता येण्याची शक्यता कमी आहे. म्हणूणच राज्यात सत्तेचा गुजरात पॅटर्न राबवण्याची तयारी जोरदारपणे सुरू आहे. या सत्तेच्या संरक्षणासाठी समाजात जातीय व धार्मिक तेढ वाढवणारे चिपळीवाले नारद चवताळून उठले आहेत. अनेक चिपळीवाले नारद ताकदीने सक्रीय झाले आहेत. इतिहासाची, वास्तवाची आणि सत्याची मोडतोड करत, समाजाला मुर्ख करत दिशाभुल करण्याचे काम जोरकसपणे सुरू आहे. म्हणूणच सावध महाराष्ट्रा सावध ! चिपळीवाले नारद चवताळून उठले आहेत. त्यांच्या कट-कारस्थानांना बळी पडू नकोस, त्यांच्या पाताळयंत्री दिशाभूलीला बळी पडू नकोस. तु तुझा महाराष्ट्र धर्म अबाधित ठेव, त्याचे रक्षण कर. तू या कपटी, कारस्थानी नारदांच्या आहारी जावू नकोस. नाही तर मोठा अनर्थ ओढवेल. महाराष्ट्र हे राज्य देशाला दिशा देणारे आहे. याचे भान महाराष्ट्राला ठेवावेच लागेल. आज मराठी माणस अस्वस्थ आहे. त्याच्या मनात विष कालवले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची जबाबदारी वेगळी आहे. महाराष्ट्राला या जबाबादारीचे भान ठेवावेच लागेल.
महाराष्ट्राला चिपळीवाल्या नारदांच्या आहारी जावून चालणार नाही. गेली नव्वद-शंभर वर्षे संघ परिवाराने मुस्लिम या देशाचे शत्रू आहेत अशी मांडणी करत सत्ता मिळवली. संघ व संघाच्या शाखा उप शाखा असा प्रचार करत राहिल्या. संघाने काही वेगळ्या संघटना व संस्था काढून त्या फुल टाईम या विद्वेषी प्रचारालाच सोडल्या आहेत. त्या संघटणांचे म्होरके केवळ हेच काम आयुष्यभर करतात. त्यासाठी त्यांच्या त्यागाचा, साधेपणाचा प्रचार-प्रसार संघ करतो. संघ त्यांना लागणारी साधन सामग्री पुरवतो. त्यांच्याकडून हे काम करून घेतो. २ खासदार ते २८२ खासदार ही वाटचाल याच बळावर भाजपाने केली. मुस्लिम द्वेषावर स्वार होत राज्य व देश ताब्यात घेतला आहे. मुस्लिमांना दहशतवादी ठरवत हा प्रवास यशस्वी केला. कॉंग्रेसवाल्यांची नालायकी यांना पुरक ठरली. त्यांच्या पथ्थ्यावर पडली. आजच्या स्थितीला कॉंग्रेसवाल्यांची हरामीच जबाबदार आहे.
मुस्लिमांचा मुद्दा बोथट होतोय आता बौध्द, दलित बांधवांना नक्षलवादी ठरवण्याचे कारस्थान रचले जात असावे अशी शंका येते आहे. त्या पध्दतीचे आरोप करायचे. समाजात मोठ्या प्रमाणात दिशाभूल करायची अन आपला हेतू साध्य करायचा, अशी त्यांची धुर्त खेळी पहिल्यापासून आहे. समाज त्यांच्या खेळ्यांना बळी पडतो ही खेदाची बाब आहे. गुजरात निवडणूकी पुर्वी मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानशी वाटाघाटी केल्याचा आरोप भाजपाने केला. त्याचा निवडणूकीत फायदा उठवला. नंतर निवडणूका होताच या लोकांनी मनमोहनसिंगाची माफी मागितली. बिहार निवडणूकीत नितिशकुमार जिंकले तर पाकिस्तानला आनंद होईल. पाकिस्तान फटाके वाजवेल असा प्रचार भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. बिहारी लोकांनी तरीही यांच्या लबाडीला लाथाडले. नितिशकुमारांना भरभरून मतदान दिले. नंतर त्याच नितिशकुमारांशी भाजपाने घरोबा केला. हा घरोबा करताना पाकिस्तानला आनंद झाला कि दु:ख झाले, तिथे फटाके वाजले की नाही वाजले हे परत त्यांनी देशाला सांगितले नाही. मतांसाठी अतिशय हलकट व विकृत मांडणी करत देशात फुट पाडण्याचे, भेद निर्माण करण्याचे षढयंत्र ते नेहमीच करत आले आहेत. जम्मू काश्मिर मधल्या मेहबुबा मुप्ती यांच्या पीडीपीला नेहमी देशद्रोही म्हणूण संबोधणारे भाजपावाले आज त्यांच्याच बरोबर काश्मिरात सत्तेत आहेत. आज हे कन्हैयाकुमारला देशद्रोही म्हणूण त्याच्यावर टिका करतात. भविष्यात त्यालाही पक्षात घेवून मंत्री करतील. मुस्लिम हे या देशाचे शत्रूच आहेत. असा समज समाजात निर्माण करणार्या संघ आणि त्यांच्या परिवारातल्या नेत्यांनी जावई मात्र मुस्लिम करून घेतले. सुब्रम्हण्यम स्वामींचा जावई मुस्लिमच आहे. विशेष म्हणजे सुब्रम्हण्यम स्वामी लव्ह जिहाद बाबत भडकावू बोलत असतात. परिवारातले नेते मुस्लिमांच्या बाबत चिथावणीखोर बोलत असतात. मात्र भाजपाचे नेते असणारे शहानवाज हुसेन व मुख्तार अब्बास नकवी हे परिवारातल्या नेत्यांचे जावई आहेत. हे आश्चर्य नव्हे का ? समाजाची दिशाभुल करून समाज विभागण्याचे कारस्थान केले जाते. ८५ टक्के असणार्या घटकांना १५ टक्के लोकांची भिती दाखवायची. त्यांच्या भितीचे भुत समाजाच्या मानगुटीवर बसवून राजकीय डाव साध्य केले जातात. असला प्रकार गेल्या नव्वद वर्षापासून सुरू आहे. मुसलमानांना शत्रू ठरवून राजकारण केले गेले. आता दलितांना व बौध्दांना नक्षलवादी ठरवण्याचे कारस्थान सुरू असल्याची शंका येते आहे. जे गद्दार आहेत, देशद्रोही आहेत त्यांच्यावर आरोप करत बसण्यापेक्षा त्यांच्यावर थेट कारवाई करावी. सरकारकडे सर्व यंत्रणा आहेत मग निव्वळ ओरोप कशासाठी ? त्यांच्यावर खटले दाखल करून पुराव्यानिशी त्यांना धडा शिकवावा. देशभक्तीचे ढोंग निर्माण करून देश तोडण्याची नालायकी योग्य नाही. याला मुँह मे राम और बगल मे छूरी | असे म्हणतात. समाज जाती-धर्मात विभागून परस्पराच्यांत आग लावणे, दंगली घडवणे म्हणजे देश तोडणे आहे. बिहारमधल्या निवडणूका जिंकण्यासाठी नितिशकुमारांच्या विजयाचा संबंध थेट पाकिस्तानशी जोडणे ही विकृती भारतीय संस्कृतीला शोभत नाही. ही विकृत मांडणीच देशविघातक व देश तोडणारी आहे. खर्या अर्थाने हाच देशद्रोह आहे. महाराष्ट्रात सध्या दलित व सवर्ण समाजात वाद पेरण्याचे काम सुरू आहे. परवाचा भाऊ तोरसेकरांचा लेख हेच विष पेरणारा होता. असे अनेक भाऊ तोरसेकरांसारखे चिपळीवाले नारद नेटाने कामाला लागले आहेत. समाजात विष कालवून आप-आपसात भिडवण्याची नालायकी सुरू आहे. महाराष्ट्राने वेळीच या कारस्थानांना ओळखले पाहिजे. समाजाची वाट लागली तरी चालेल, लोकांचे मुडदे पडले तरी चालतील पण आपले साम्राज्य अबाधित राहिले पाहिजे. त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारी प्रवृत्ती हलकट असते. सध्या हा हलकटपणा जोरात सुरू आहे. म्हणूणच महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी सावध रहायला हवे. या विषारी प्रवृत्ती रोखायला हव्यात. यांच्या कारवायांना चाप लावायला हवा.
0 Comments