पुणे - देशात गेल्या वर्षी दडी मारलेल्या पावसाने यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या दोन महिन्यांमध्ये सरासरी गाठली असल्याची समाधानाची बातमी भारतीय हवामान खात्याने सोमवारी दिली. त्याच वेळी पुढील दोन महिन्यांमध्ये नैर्ऋत्य मौसमी पावसाची (मॉन्सून) वाटचाल "आस्ते कदम‘ होईल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. देशात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडेल, असा पहिला दीर्घकालीन पावसाचा अंदाज हवामान खात्याने मेमध्ये व्यक्त केला होता. पावसाळ्यातील पहिल्या दोन महिन्यांचा देशातील आढावा हवामान खात्याने जाहीर केला. अंदमान आणि निकोबार बेटांवर मेपूर्वी पोचला मॉन्सून केरळमध्ये पोचण्यास उशीर झाला. त्यामुळे जूनमध्ये दिलेल्या अंदाजापेक्षा 11 टक्के कमी पावसाची नोंद झाली; पण जुलैमध्ये देशात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रात सलग दोन वर्षे दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडला. जुलैमध्ये दिलेल्या अंदाजाच्या तुलनेत सात टक्के जास्त पाऊस पडला. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांमध्ये मिळून पावसाने दीर्घकालीन अंदाजाप्रमाणे सरासरी गाठली आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक, रायलसीमा आणि तमिळनाडू या हवामान खात्याच्या उपविभागामध्ये जुलैमध्ये सर्वदूर दमदार पाऊस पडला.
No comments:
Post a Comment