सुकुमार मोहोळे सरांचे अष्टपैलू योगदान प्रशालेच्या इतिहासात मैलाचा दगड' : सेवापूर्ती सोहळ्यात मान्यवरांचे गौरवोद्गार!
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- वृत्तसंस्था येथील पद्मश्री सुमतिबाई शहा ट्रस्ट संचलित 'उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे 25 वर्षे अविरत ज्ञानदान करून शासनाच्या विहित वयोमानानुसार ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झालेले प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांचा भव्य सेवानिवृत्ती सत्कार व निरोप समारंभ आज अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्राविका विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिसिजन कंपनीचे समन्वयक माधव देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून श्राविका संस्थेच्या मार्गदर्शिका दीप्ती शहा, उमाबाई श्राविका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आश्विनी पंडित, उपमुख्याध्यापिका माधवी खोत आणि पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ,मोहोळे सर यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय व पालक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वललाने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अत्यंत सुमधुर स्वरांत स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापिका आश्विनी पंडित आणि इतर सहकाऱ्यांनी आजचे सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांचा सपत्नीक सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यात प्रास्ताविकपर मनोगतातून प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित यांनी सरांनी आपल्या सेवाकाळात प्रशालेसाठी दिलेल्या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सेमी इंग्रजी माध्यम, फाउंडेशन वर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रात्रअभ्यासिका, अशा अनेकविध नवोपक्रमांद्वारे गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मॅडम यांनी दिले. यावेळी शाळेतील शिक्षकांचे सरांविषयीचे मनोगत,अनुभव संग्रहित असलेले विशेष असे स्मृतिगंध या पुस्तकाचे प्रकाशन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षक मनोगतद्वारे प्राध्यापक गणेश लेंगरे व सहशिक्षक सुहास छंचुरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रशालेच्या विद्यार्थिनी रामेश्वर बंडगर व श्रेया कांबळे या विद्यार्थिनींनीदेखील सरांबद्दलच्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. पालक प्रतिनिधी म्हणून पोपटराव कोंडुभैरी व ओहळ यांनी सरांचा हृदय सत्कार केला. मोहोळे सरांचे वडीलबंधू इंद्रजीत मोहोळे यांनी देखील आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. लहानपणापासूनच मोहोळे सर धडपडी व जिद्दी असल्याचे मत त्यांनी प्रतिपादन केले.
सेवापूर्ती सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतद्वारे मोहोळे सरांनी आपला जीवन प्रवास उलगडला. आपल्या बंधूंनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला तसेच संस्थेचे विश्वस्त पं. पद्मश्री सुमतीभून, रतनचंदजी शहा, प्रशालेच्या प्रथम मुख्याध्यापिका विद्युल्लता शहा, हर्षवर्धनजी शहा यांच्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ते भावूक झाले. संस्थेने दिलेली संधी, सर्व सहकाऱ्यांचे लाभलेले अमूल्य सहकार्य आणि विद्यार्थ्यांचे प्रेम यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "शाळेतून अधिकृतपणे निवृत्त होत असलो, तरी विद्यार्थ्यांच्या मनात आणि शैक्षणिक कार्यात मी सदैव जोडलेला राहीन," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व दर्जेदार अध्यापनासाठी भेट म्हणून पाच स्मार्ट बोर्ड देणार असल्याचेही यावेळी जाहीर केले. त्यातील एका स्मार्टबोर्डच्या रकमेचा चेकही संस्थेकडे सुपूर्द केला.
यावेळी प्रतीक्षा मोहोळे, निवृत्त प्राध्यापक राजकुमार नवले यांची
यावेळी समायोचित भाषणे झाली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सरांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना प्रिसिजन कंपनीचे समन्वयक माधव देशपांडे यांनी सरांच्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेचा गौरव करत, त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी नेहमीच दीपस्तंभासारखे प्रेरणादायी राहील असे सांगितले. सरांनी टायर्ड न होता पुढील जीवन कुमारांसारखे जगावे,सामाजिक व शेती क्षेत्रात कार्य करावे असा सल्ला दिला व पुढील निरोगी, सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन सहशिक्षिका पल्लवी खांडवे व सहशिक्षक अनुप कस्तुरे यांनी केले तर आभार सोनाली उंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख राजश्री आगरखेड, अनंत बेळळे, अभिजीत पाटील, अभिनंदन उपाध्ये,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी तर रांगोळी सहशिक्षिका केतकी सोनटक्के यांनी रेखाटली होती.


No comments:
Post a Comment