फळबागा आणि पशुधन वाचविण्यासाठी शिवार बैठका घ्या- राजकुमार हिवरकर पाटील
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांसमोर फळबागा जगविणे आणि पशुधनाचे संवर्धन करणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उजनी व वीर धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करून फळबागा टिकविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिवारात प्रत्यक्ष बैठका आयोजित कराव्यात. तसेच पशुधनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत, अशी मागणी शिवसेना ओबीसीचे च जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची उपजीविका फळबागांवर अवलंबून आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत असून, शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन उभ्या केलेल्या फळबागा जगविण्याची चिंता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उजनी व वीर धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे.यासाठी कृषी विभागाने गावोगावी शिवार बैठका घेऊन शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर, पाणी व्यवस्थापन, आच्छादन तंत्रज्ञान, कमी पाण्यात फळबागांचे संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन याबाबत तज्ज्ञांमार्फत प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शेतीबरोबरच शेतकऱ्यांचे पशुधन हेदेखील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना पिण्याचे पाणी, हिरवा व सुका चारा उपलब्ध करून देणे, चारा साठवणूक, पशुखाद्य व्यवस्थापन तसेच जनावरांचे आरोग्य जपणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
यासाठी कृषी विभागाने पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने गावोगावी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत. शेतकऱ्यांना चारा नियोजन आणि पशुधन संवर्धनाच्या प्रभावी उपाययोजनांची माहिती द्यावी, अशीही मागणी राजकुमार हिवरकर पाटील यांनी केली आहे.केवळ कार्यालयीन पातळीवर मार्गदर्शन न करता कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि उपलब्ध शासकीय योजनांची माहिती द्यावी. दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि पशुधन दोन्ही टिकविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
याप्रसंगी माळशिरस तालुकाप्रमुख तानाजीराव भोळे पाटील, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, जिल्हा संघटक बापू लोखंडे, शिवसेनेचे हेमंत चव्हाण यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, माळशिरस तालुक्यातील सर्व मंडल कृषी अधिकारी, कृषी अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या फळबागा आणि पशुधन वाचविण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने तातडीने नियोजनबद्ध पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment