करमाळा पंचायत समितीत संविधान दिन उत्साहात पार पडला
करमाळा (कटूसत्य वृत्त):- भारतीय संविधान दिनानिमित्त करमाळा पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) संविधान वाचन आणि प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर सोनवणे यांच्या आदेशानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव रमेश शिंदे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल काळे, गटशिक्षणाधिकारी रिंकल हाडके, सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश जरांडे, हनुमंत भोसले, सहाय्यक लेखाधिकारी सिकंदर फकीर, गोरख खंडागळे, लियाकत शेख, श्रीराम हजारे आदी उपस्थित होते.
संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित प्रश्नमंजुषा उपक्रमात पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह करमाळा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पत्रकारांनीही सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संविधानविषयक २० प्रश्नांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. पंचायत समितीतील क वर्गापासून अ वर्गापर्यंतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या लेखी प्रश्नमंजुषेत सहभाग नोंदवत प्रश्नपत्रिका सोडवली. या उत्तरपत्रिकांची तपासणी सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांनी केली. परीक्षेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक जाहीर करून संबंधितांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रश्नमंजुषेत करमाळा तालुका पत्रकार संघाचे शितलकुमार मोटे, आशपाक सय्यद, प्रशांत भोसले, उमेश पवळ, हर्षवर्धन गाडे आदी पत्रकारांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी आणि नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, या उद्देशाने दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या अनुषंगाने संविधानाचे महत्त्व, तत्त्वे आणि मूल्ये नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यशाळा, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, निबंध लेखन, वादविवाद, व्याख्याने आणि चित्रकला अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव रमेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी सुवर्णा बोराडे, सुजाता पारेकर, छाया बेडकुते, अनुजा जाधव, दमयंती निमगिरे, अनुजा साखरे, वीरकुमार देशमुख, दत्तात्रेय सुतार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब गुटाळ, अतिषा पवार, साळवे मॅडम, नितीन अलाट, विकास शिंदे, आबासाहेब पवार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश जरांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---
चौकट -- संविधान दिनाचे ऐतिहासिक महत्त्व
भारतीय संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार केला. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संविधानाचा मसुदा तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
– महादेव रमेश शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, करमाळा
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment